राहुल गांधींना धक्काबुक्की; सुप्रिया सुळे भडकल्या!
हाथरस प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीचा खासदार सुप्रिया सुळे यांनी निषेध केला आहे
राहुल गांधींना धक्काबुक्की; सुप्रिया सुळे भडकल्या!
मुंबई: बारामती वार्तापत्र
हाथरस येथील सामूहिक बलात्कार व खून प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी पायी निघालेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशच्या पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीचे तीव्र पडसाद उमटत आहेत. काँग्रेस नेत्यांनी उत्तर प्रदेश सरकार व पोलिसांवर टीकेची झोड उठवली आहे. आता अन्य विरोधी पक्षही आवाज उठवू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे.
‘यमुना एक्सप्रेस वेवर उत्तर प्रदेश पोलिसांकडून राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाली. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे,’ असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. ‘कुठल्याही राज्याचं प्रशासन असू दे… बलात्कारासारखी लाजिरवाणी घटना घडल्यावर प्रशासनाने फास्टट्रॅक पद्धतीने ॲक्शन घेतली पाहिजे. ती व्हावी या मागणीसाठी राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबाला भेटायला जात होते. राहुल गांधी हे संसदेचे सदस्य आहेत. त्यांच्याशी असं वर्तन केलं जाणार असेल, यूपी सरकारकडून दडपशाही होणार असेल तर त्याचा जाहीर निषेध करते, असं त्यांनी म्हटलं आहे.
‘न्याय्य मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या किंवा एखाद्याच्या भेटीसाठी जाणाऱ्या लोकप्रतिनिधीची वा कुठल्याही व्यक्तीची पोलिसांनी कॉलर धरणं कितपत योग्य आहे, असा सवाल सुळे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केला आहे.
तत्पूर्वी, हाथरसच्या घटनेचा निषेध करताना सुळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून योगी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. ‘केंद्र सरकारच्या बेटी बचावो, बेटी पढावो या योजनेच्या नेमका उलटा कारभार यूपीमध्ये सुरू असल्याची टीका सुळे यांनी केली आहे.