रेशन दुकानदाराकडून होणाऱ्या फसवणूकीची तक्रार करणाऱ्यास मारहाण
औरगाबाद :रेशन दुकानदाराकडून ग्राहकांची फसवणूक होत असल्याची तक्रार केल्यामुळे रेशन दुकानदाराच्या नातेवाईकांकडून एका शिक्षकाला बेदम मारहाण ही घटना आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास औरंगाबाद जिल्ह्यातील मांडकी गावात घडली. या घटनेप्रकरणी शिक्षकाने पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र, पोलिसांकडून अद्यापही या घटनेची दखल घेण्यात आलेली नाही.
कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनदरम्यान गरीब आणि होतकरु जनतेसाठी सरकारने मोफत रेशन देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मांडकी गावातील रेशन दुकानदार शांतीलाल थोरात याच्याकडून ग्राहकांची फसवणूक केली जात होती. रेशन दुकानदाराकडून पुरेशा प्रमाणात रेशन दिलं जात नव्हतं, ते पुरेशा प्रमाणात दिलं जावं, अशी मागणी शिक्षकाने केली होती. याप्रकरणी शिक्षकाने तक्रारदेखील केली होती. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.
शिक्षकाने केलेल्या तक्रारीचा राग मनात धरुन या रेशन दुकानदाराच्या नातेवाईकांनी शिक्षकाच्या घरावर हल्ला केला. रेशन दुकानदाराच्या नातेवाईकांकडून शिक्षकाच्या घरावर दगडफेक करण्यात आली. शिक्षकाला बेदम मारहाण केली गेली. यावेळी महिलांनादेखील धक्काबुक्की करण्यात आली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या गंभीर घटनेप्रकरणी शिक्षकाने पोलिसात तक्रार केली. मात्र, पोलिसांकडून अद्यापही घटनेची दखल घेतली गेली नाही.