रोहित पवारांनी कार्यकर्त्यांकडून मागितलं ‘हे’ बर्थ-डे गिफ्ट
राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण तडफदार आमदार रोहित पवार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून एक गिफ्ट मागितलं आहे.
रोहित पवारांनी कार्यकर्त्यांकडून मागितलं ‘हे’ बर्थ-डे गिफ्ट
राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण तडफदार आमदार रोहित पवार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून एक गिफ्ट मागितलं आहे.
अहमदनगर:बारामती वार्तापत्र
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचा उद्या वाढदिवस आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त बॅनर, बुके, केक यावर खर्च करण्यापेक्षा सध्याच्या संकटाच्या काळात सामाजिक भान जपण्याचं आवाहन रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. त्यासाठी त्यांनी स्वत:हून कार्यकर्त्यांकडे वाढदिवसाचं एक गिफ्ट मागितलं आहे.
फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट करून रोहित पवार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार मानतानाच त्यांनी कार्यकर्त्यांकडे हक्कानं एक मागणी केली आहे. ते म्हणतात, ‘करोनाच्या संकटामुळं सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मात्र, अनेकांकडे ऑनलाइन शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध नाहीत. अशा मुलामुलींना मदत करता येईल का? त्यांच्यासाठी खर्च करता येईल का? गरजू विद्यार्थ्यांना स्मार्टफोन घेऊन देता येईल का? दहावी, बारावी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक शुल्काचा भार उचलता येईल का? याचा विचार करावा. काही कारणास्तव नैराश्य आलेल्या तरुणांना आधार देण्याचा विचार करावा.’
‘मी केवळ इतरांना सांगतो आहे असं नाही. जमेल तेवढं मी स्वत: करत आहे. बारामतीतील शारदानगर संकुलातील १०० मुलींच्या शिक्षणाचा यंदाचा खर्च उचलण्याचा संकल्प मी माझ्या वाढदिवसानिमित्तानं केला आहे.
‘करोना झालेल्या व्यक्तीसह त्यांचं कुटुंबही तणावाखाली असतं. अशा कुटुंबांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करावा. कोविड काळात आघाडीवर राहून लढणाऱ्या आपल्या परिसरातील, गावातील करोना योद्ध्यांना एखादं फुल देऊन त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करावा. असं काही सामाजिक काम आपल्या हातून झाल्यास ते सोशल मीडियात शेअर करावे किंवा माझ्या अकाऊंटला टॅग करावे. ते माझ्यासाठी सर्वात मोठं बर्थ डे गिफ्ट असेल,’ असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. ‘येणारा काळ जसा संधींचा असेल तसा तो अडचणींचाही असेल. त्यातून आपल्यालाच मार्ग काढावा लागेल. सकारात्मक राहून काम केल्यास खूप काही चांगलं घडू शकेल. त्यासाठी एकत्र राहू या,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.