लसीचे दोन डोस घेतले नसतील तर कदाचित शिक्षकांना पगार मिळणे कठीण जाणार!
लसीकरण नसेल तर अशा शिक्षकांना शाळेत येण्याची परवानगी नाही
लसीचे दोन डोस घेतले नसतील तर कदाचित शिक्षकांना पगार मिळणे कठीण जाणार!
लसीकरण नसेल तर अशा शिक्षकांना शाळेत येण्याची परवानगी नाही
औरंगाबादः प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले नसतील तर कदाचित शिक्षकांना पगार मिळणे कठीण जाणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील शिक्षकांना पगार बिलासोबत कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन डोसचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश देण्यात आले आहेत.
दोन हजार शिक्षकांचे पूर्ण लसीकरण बाकी
काही दिवसांपूर्वी शि७ण विभागाने घेतलेल्या माहितीत दोन हजार शिक्षकांचा लसीचा दुसरा डोस घेणे शिल्लक होते. विद्यार्थी सुरक्षितता लक्षात घेता आता शिक्षकांना दोन डोस घेणे अनिवार्य करण्यात आले आहेत. कोरोना परिस्थितीमुळे दीड वर्षापासून शाळा बंद होत्या. मध्यंतरी ग्रामीण भागातील शाळा सुरु झाल्या होत्या. मात्र नंतर दुसरी लाट आली. दरम्यान आता कोरोनाचा प्रादुर्भाव हळू हळू कमी झाल्याने ग्रामीण भागासह शहरातील आठवी ते बारावीचे वर्ग असलेल्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. विद्यार्थी सुरक्षितता लक्षात घेता, मुलांना शाळेत येताना पालकांचे संमतीपत्र आवश्यक करण्यात आले आहे.
खासगी शाळांनाही नियम
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी सांगितले की, कोरोना नियमांचे पालन करताना शहरातील खासगी शाळांनीही शिक्षकांचे लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. लसीकरण नसेल तर अशा शिक्षकांना शाळेत येण्याची परवानगी नाही, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, एखाद्या शिक्षकाचा दुसरा डोस झालेला नसेल तर त्यांना वेतन मिळण्यास अडचण येऊ शकते, असा इशारा गटणे यांनी दिला आहे.
जिल्ह्यात बुधवारी 11 नवीन रुग्ण
औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे 11 नवीन रुग्ण (शहर 3, ग्रामीण 8) आढळले तर एकाचा मृत्यू झाला. दिवसभरात 10 जणांना (शहर 5, ग्रामीण 5) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 1,45,287 रुग्ण बरे झाले. एकूण रुग्णांची संख्या 1,49,005 झाली आहे. 3,598 जणांचा मृत्यू झाला असून सध्या 120 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.