परखड बोलण्यासाठी सर्वश्रुत असणाऱ्या अजित पवारांनी कार्यकर्त्यांची केली कानउघडणी
सावकारकी करणाऱ्यांना सज्जड दम अवैध धंदे बंद करा

परखड बोलण्यासाठी सर्वश्रुत असणाऱ्या अजित पवारांनी कार्यकर्त्यांची केली कानउघडणी
सावकारकी करणाऱ्यांना सज्जड दम अवैध धंदे बंद करा
बारामती वार्तापत्र
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बऱ्याच दिवसांनंतर त्यांचा स्वभाव दाखवत सावकारीच्या प्रश्नावरून व लोकांनी केलेल्या तक्रारीवरून परखड बोल सुनावले. आज अजितदादांनी महाआरोग्य शिबीरासह उदघाटनाचेही काही कार्यक्रम झाले. महाआरोग्य शिबीरादरम्यान दादांनी हे परखड बोल सुनावले.
अजित पवार म्हणाले, मुळात कोणी वेडीवाकडी कामे करू नका. वेडीवाकडी कामे करणाऱ्या्ंच्या नादी लागू नका. मला बरेच जण भेटतात, याला पैसे दिले, त्याने कामच केले नाही. पैसेही दिले नाहीत. अरे बाबांनो, जर तुम्ही या गावात राहता, तर तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे की, कोण काम करू शकतो, कोण आपल्याला चुना लावू शकतो. कोण आपल्याला फसवतोय, एवढे जर माहिती होत नसेल तर त्यात कशाला पडता? मुळात कोणाला पैसेच देता कशाला? कुठेही बेकायदेशीर धंदा, सावकारीचा धंदा कोणी करू नका. कुणी व्याजाने पैसे द्यायचा धंदा करीत असेल, तर कोणी कितीही मोठ्या बापाचा असला तरी त्याला सोडणार नाही.
दादा पुढे म्हणाले, कधीकधी कानावर येते की, १० रुपये शेकडा व्याजाने पैसे दिले जातात. कोणाच्या जमीनी लिहून घेतल्या जातात. त्याला मी सोडणार नाही. त्याला तडीपार करेन, मोका लावेल. त्यामुळे कोणी बगलबच्चे असतील, तर त्यांना वेळीच सांगा, वेडीवाकड्या गुंतवणूका करू नका. वेडीवाकडी कामे करणाऱ्यांच्या नादी लागू नका. आपल्याला हे सरळ कळते की, कोण चुना लावणार आहे. त्यामुळे कोणीतरी येऊन जर सांगत असेल की, आमचे पैसे याने बुडवले. त्याने फसवणूक केली, तर अगोदर तुम्हीच का त्यांना पैसे दिले? तुमचे बुडलेले पैसे वसूल करून द्यायला मी उपमुख्यमंत्री झालेलो नाही.