लोणचे मसाल्याच्या चोरीचा गुन्हा इंदापुर पोलिसांकडून ७ तासात उघड
पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त

लोणचे मसाल्याच्या चोरीचा गुन्हा इंदापुर पोलिसांकडून ७ तासात उघड
पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त
इंदापूर : प्रतिनिधी
अपघात झाल्याचा बनाव करत बिल्ट कंपनी (भिगवण, ता. इंदापूर, जि. पुणे) जवळून चौघा जणांनी पळवलेला टाटा कंपनीचा कंटेनर (एमएच-०४-इवाय-९०५४) आणि त्यातील ११ लाखांचे लोणचे मसाल्याचे २०० बॉक्स असा एकूण १५ लाख रुपयांचा चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करून इंदापूर पोलीसांनी अवघ्या ७ तासांत गुन्ह्याचा छडा लावला आहे. ट्रक चालक चंद्रकांत तुळशीराम कांबळे (रा. मिरजापूर, ता. बसवकल्याण, जि. बिदर) यांनी कंटेनर पळवलेल्या चौघांविरोधात (दि.१८) मध्यरात्री इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
महाशक्ती लॉजिस्टिक ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कंटेनरमधून ११ लाख रु. किंमतीचे लोणचे मसाल्याचे २०० बॉक्स घेऊन १४ सप्टेंबर रोजी विजयवाडा येथून मुंबई येथील न्हावाशेवा बंदराकडे निघालेल्या या कंटेनरचा चालक चंद्रकांत कांबळे यांनी उजनी ब्रिज पास केल्यावर भाचा प्रशांत याने त्याचा मित्र श्रीनिवास चांदे याला कंटेनर चालवण्यास देऊन स्वतः मागे जाऊन झोपले. दरम्यान, भिगवण येथील बिल्ट कंपनीजवळ आल्यानंतर कंटेनर थांबवून चंद्रकांत कांबळे यांना सरडेवाडी टोलनाक्याजवळ अपघात झाल्याचे कारण देत कंटेनरचा मागील दरवाजा चेक करण्यास सांगून श्रीनिवास चांदे, भाचा प्रशांत, अन्य एक मित्र आणि सरडेवाडी टोलनाक्याजवळ चढलेला आणखी एक जण अशा चौघांनी कंटेनर घेऊन पळाल्याचे कांबळे यांनी फिर्यादीत म्हटले होते.
त्या अनुषंगाने इंदापूर पोलीसांनी तत्पर हालचाली करत सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने आणि पोलीस उपनिरीक्षक लिंगाडे अशा ३ पथकांच्या माध्यमातून सरडेवाडी टोलनाका ते पाटस टोलनाका दरम्यान संशयित वाहने, सर्व ढाबे, हॉटेल्स आणि पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही तपासून अखेर रावणगाव (ता. दौंड) येथे हा कंटेनर संपूर्ण मुद्देमालासह अवघ्या ७ तासांत हस्तगत केला. या घटनेतील सर्व आरोपी अद्याप फरार असून, मुंबईतील ट्रान्सपोर्ट कंपनी अथवा अन्य कोणी या गुन्ह्यात सामील आहे का याचा सखोल तपास इंदापूर पोलीस करत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लिंगाडे, सफी सतिश ढवळे, पोलीस नाईक मोहिते, पोलीस नाईक मोहम्मदअली मड्डी, पोलीस नाईक खान, पोलीस नाईक गाढवे, पोलीस कॉन्स्टेबल मुटेकर, पोलीस कॉन्स्टेबल यादव, पोलीस कॉन्स्टेबल गोसावी यांनी पार पाडली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लिंगाडे करत आहेत.