वंचित बहुजन आघाडीचे इंदापूर नगरपरिषदे समोर विविध मागण्यांच्या संदर्भात बेमुदत धरणे आंदोलन
मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

वंचित बहुजन आघाडीचे इंदापूर नगरपरिषदे समोर विविध मागण्यांच्या संदर्भात बेमुदत धरणे आंदोलन
मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर शहरातील आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील तसेच दारिद्र्यरेषेखालील नागरिकांच्या विविध मागण्यांसंदर्भात वंचित बहुजन आघाडीने इंदापूर नगरपरिषदे समोर सोमवार ( दि.२९ ) पासून बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे.
इंदापूर शहरातील दलित वस्ती व शहरातील आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील धारकांची घरपट्टी व नळपट्टी माफ करावी तसेच सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेतील दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना त्वरित पिवळे रेशन कार्ड मिळावे,१९९६-९७ साली झालेल्या दारिद्रय रेषे सर्वेक्षणांप्रमाणे २००५-०६ चा सर्वे धरून नागरिकांना त्यांच्या हक्काचे पिवळे रेशन कार्ड मिळावे इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी बोलताना वंचीत बहूजन आघाडीचे जिल्हा महासचिव हनुमंत कांबळे म्हणाले की, गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही सदरील मागण्यांच्या संदर्भात पाठपुरावा करत असताना सत्ताधारी व प्रस्थापित याकडे दुर्लक्ष करत आहेत. गेल्या दीड दोन वर्षात कोरोनाच्या काळात गोरगरीबांना कामधंदा नाही. हातावर पोट असणाऱ्यांचे जीवन जगणे मुश्किल झाले आहे. सदरील मागण्या प्रशासनाने मान्य कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडू.
तसेच यावेळी बोलताना इंदापूर तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा राणी कोकाटे म्हणाल्या की, गेल्या दीड-दोन वर्षांत कोविड काळामध्ये नगर परिषद हद्दीतील लोकांना शहरातील नियम अटी पाळाव्या लागत होत्या, नागरिकांना घराबाहेर पडता येत नसल्याने व हाताला काम धंदा नसल्याने उपासमार होत होती. ज्या लोकांना दलित वस्तीतील लोकांनी निवडून दिले तेच नागरिकांच्या प्राथमिक गरजा भागवू शकत नाहीत. त्यामुळे आगामी काळातील निवडणुकांमध्ये या वस्तीत जाऊन मते मागण्याची पुढाऱ्यांची लायकी आहे का ? असा प्रश्न कोकाटे यांनी यावेळी उपस्थित केला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सागर गायकवाड, शहराध्यक्ष अविनाश मखरे,प्रमोद चव्हाण,अतुल सोनकांबळे,उमेश खरात,अमोल भोसले,अनिल साबळे,बोधिराज चव्हाण,विलास गायकवाड,विकास भोसले,पंकज बनसोडे उपस्थित होते.