मुंबई

वन्यजीवांचे संरक्षण करून पर्यावरणाचा समतोल राखा – उपमुख्यमंत्री अजित पवार

‘जागतिक वन्यजीव दिना’निमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

वन्यजीवांचे संरक्षण करून पर्यावरणाचा समतोल राखा – उपमुख्यमंत्री अजित पवार

‘जागतिक वन्यजीव दिना’निमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

मुंबई, बारामती वार्तापत्र रिपोर्ट

महाराष्ट्रात जैव विविधता मोठ्या प्रमाणावर आहे. ही जैव विविधता टिकविण्यासाठी आपण सामूहिक प्रयत्न करावेत, पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, वन्यजीवांचे संरक्षण करून सर्वांनी पर्यावरणाचा समतोल राखावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करुन राज्यातील जनतेला ‘जागतिक वन्यजीव दिना’च्या शुभेच्छा दिल्या.

जागतिक वन्यजीव दिनाचे औचित्य साधून, ‘बायो स्फिअर’ आणि ‘व्हाईस ऑफ द वाईल्ड’ संस्थेच्या भोरड्या (पळस मैना) या पक्षावरील शॉर्ट फिल्मचे (लघुपट) प्रदर्शन तसेच पर्यावरणासाठी दृक-श्राव्य माध्यमातून योगदान देणाऱ्या ‘वन्यजीवांचा आवाज’ या संस्थेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज मंत्रालयातील समिती सभागृहात करण्यात आले.

यावेळी वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, बायो स्फिअर, व्हाईस ऑफ द वाईल्ड संस्थेचे डॉ.सचिन पुणेकर, सुधीर सावंत, निविदिता जोशी, मंदार नागरगोजे, शाहू सावंत उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, महाराष्ट्राकडे पर्यटकांचा ओढा आहे. आपले ऐतिहासिक, कृषी, निसर्ग, धार्मिक पर्यटन समृद्ध आहे. पक्षांना पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने ग्रामीण भागाकडे येत आहेत. ‘बायो स्पेअर’ संस्थेची भोरड्या (पळस मैना) पक्षांवरची शॉर्ट फिल्म पाहून पक्षी पर्यटनाकडे लोकांचा ओघ वाढेल. भोरड्या हा पक्षी निसर्गाचा मित्र आहे. हे पक्षी केवळ मनोरंजन करत नाहीत, तर गवतांच्या बियांबरोबरच लाखोंच्या संख्येने किटक खातात. त्यामुळे शेतकऱ्यांची पीके सुरक्षित राहतात. अशा या निसर्ग मित्र पक्षाचे आपण संरक्षण केले पाहिजे. निसर्गाचा समतोल राखला पाहिजे. महाराष्ट्रात पर्यटकांमध्ये ‘पक्षी पर्यटना’ विषयी आवड निर्माण होईल, असा विश्वासही उपमुख्यंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी अजानवृक्षाला जलार्पण, भोरड्या पक्षावरील लघुपटाचे प्रदर्शन, वन्यजीवांचा आवाज संस्थेचे उद्घाटन, संस्थेच्या लोगोचे अनावरण, भोरड्या पक्ष्याच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

Related Articles

Back to top button