वादळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करा : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
नीरा नरसिंहपूर, गिरवी भागातील नुकसानीची केली पाहणी

वादळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करा : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
नीरा नरसिंहपूर, गिरवी भागातील नुकसानीची केली पाहणी
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यात मृग नक्षत्राच्या पहिल्याच पावसात वादळी वाऱ्याच्या माऱ्यामुळे फळपिके, विद्युत खांब, गोठ्यांचे व घरांची मोठ्या प्रमाणात पडझड होऊन नुकसान झाले आहे.त्याचे पंचनामे युद्धपातळीवर तातडीने करून घ्यावेत,अशा सूचना सामान्य प्रशासन राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संबंधित प्रशासनाला दिले.
गिरवी ( ता. इंदापूर ) येथे वादळी वारे व पावसामुळे नुकसान झालेल्या केळी बागेच्या पाहणी प्रसंगी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. यावेळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश शिंदे, युवकचे प्रदेश सरचिटणीस संग्रामसिंह पाटील, रोहयोचे तालुका अध्यक्ष श्रीकांत बोडके, युवकचे तालुका सरचिटणीस नागेश गायकवाड, पांडुरंग डिसले, दादासाहेब क्षिरसागर, दिपक क्षिरसागर आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना राज्यमंत्री भरणे म्हणाले की, इंदापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने झालेल्या नुकसानींच्या पंचनाम्यातून कोणीही वंचित राहता कामा नये. प्रशासनातील सर्व विभागाच्या प्रमुखांनी बारकाईने याकडे लक्ष द्यावे.तसेच विद्युत खांबांचे उभारणी तातडीने करून वीज पुरवठा सुरळीत करावा असे आदेश त्यांनी दिले.
दरम्यान मंत्री भरणे यांनी तहसीलदार श्रीकांत पाटील यांना भ्रमण दूरध्वनीद्वारे विचारणा केली असता नुकसान झालेल्यांचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. तसेच शासनास अहवाल सादर करण्यात येईल असे सांगितले.
गिरवी, टणू, नरसिंहपूर, पिंपरी बुद्रुक, गोंदी, ओझरे आदि भागात वादळी वाऱ्यामुळे केळी, डाळिंब, ऊस, पपई, पेरू पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर विद्युत खांब, गोठ्या वरील व घरावरील पत्रे, शेडचे मोठे नुकसान झाले आहे. सदर नुकसानीची पाहणी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पदाधिकाऱ्यां समवेत केली.