पुणे

विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या-उपमुख्यमंत्री अजित पवार

गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम

विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या-उपमुख्यमंत्री अजित पवार

गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम

पुणे; प्रतिनिधी

विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्यातील कौशल्याचा विकास करण्यावर विशेष भर देण्यात यावा. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि नैतिक मूल्यांची वाढ व्हावी,  विद्यार्थी गुणवंत, ज्ञानवंत होण्यासोबतच प्रज्ञावंत, चारित्र्यसंपन्न व्हावेत याकडेही शिक्षकांनी विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

अल्पबचत भवन येथे जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, समाजकल्याण सभापती सारिका पानसरे, पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, महिला व बालकल्याण सभापती पुजा पारगे, शिक्षण समिती सदस्या अरूणा थोरात, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, नव्या युगाच्या आवाहनांना सामोरे जाणारे विद्यार्थी घडविण्यासाठी शैक्षणिक दर्जा उंचावणे ही शिक्षकांची मोठी जबाबदारी  आहे. कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक नुकसान भरून काढावे लागणार आहे. कोरोनानंतर शाळेत येणारा विद्यार्थी ताणतणावात राहणार नाही, असे शैक्षणिक वातावरण तयार करण्यावर शिक्षकांनी भर द्यावा. पालकांचाही यामध्ये सहभाग महत्त्वाचा राहणार आहे. आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक, देशाचे भविष्य आहेत. हे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान देऊन चालणार नाही, तर मिळवलेल्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करण्याचे कौशल्यही त्यांना शिकवायला हवे.

जीवनात यशस्वी होण्यासाठी ज्ञानाइतकेच विज्ञान तंत्रज्ञान, कौशल्यांचा विकासही महत्वाचा आहे. कलाकौशल्यापासून संवाद कौशल्यापर्यंत प्रत्येक गोष्टी जमल्या पाहिजेत. समाजात यशस्वी झालेल्या व्यक्तींनी ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाची सांगड घालून त्याचा उपयोग जीवनात केल्याने ते यशस्वी झाले आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांचा कित्ता गिरवला पाहिजे. त्यांच्यासारखी विज्ञानाची कास धरली पाहिजे. असे कौशल्य विद्यार्थ्यांनी मिळवावे त्यासाठी शिक्षकांनी मार्गदर्शन करावे. शिक्षणाच्या प्रभावी उपयोगासाठी, देशाच्या, समाजाच्या विकासासाठी ते आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

जिल्हा परिषद शाळेमध्ये चांगले बदल केले आहेत, राज्यातील काही भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढते आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेला पायाभूत सुविधा देण्यासाठी आपला सातत्याने प्रयत्न आहे.  दुर्गम, डोंगरी भागातील शिक्षक, विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठीही आपण सर्वतोपरी सहकार्य करू.

महिलांना सन्मान मिळाला पाहीजे, यासाठी राज्य शासनाने चौथे महिला धोरण आणण्याचा निर्णय घेतला असल्याचेही श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.

जि.प. अध्यक्षा श्रीमती पानसरे म्हणाल्या,  कोरोना कालावधातीही शिक्षकांनी ज्ञानदानाचे अत्यंत चांगले कार्य केले आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण सातत्याने सुरू राहीले. ग्रामीण भागातील अनेक शाळा आदर्श करण्यासाठी शिक्षकांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. शिवतरे  यांनी पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली.

यावेळी पुणे जिल्हा परिषदेने तयार केलेल्या सामान्य ज्ञान मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी गुणवंत शिक्षक, शिक्षिका, त्यांचे कुटुंबीय, शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.
000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram