स्थानिक
अकॅडमी गैरप्रकरणांकडे केवळ शैक्षणिक नव्हे तर सामाजिक व कायदेशीर समस्येच्या दृष्टीने पाहण्याची गरज – ॲड. सुधीर पाटसकर
शिक्षण व्यवस्था ही समाजाचा पाया आहे.

अकॅडमी गैरप्रकरणांकडे केवळ शैक्षणिक नव्हे तर सामाजिक व कायदेशीर समस्येच्या दृष्टीने पाहण्याची गरज – ॲड. सुधीर पाटसकर
शिक्षण व्यवस्था ही समाजाचा पाया आहे.
बारामती वार्तापत्र
बारामतीः कोचिंग क्लासेस/अकॅडमींच्या निकालाची हमी, निकाल निश्चित या आश्वासनाचा गैरप्रकाराकडे शैक्षणिक प्रश्न म्हणून नव्हे तर सामाजिक व कायदेशीर दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.सुधीर पाटसकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना लेखी स्वरूपात दिली आहे.
महाराष्ट्रातील परीक्षा गैरप्रकार, पेपरफुटी, कॉपी प्रकरणे व काही कोचिंग क्लासेस/अकॅडमींच्या संभाव्य सहभागा बाबत विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिक्षण व्यवस्था ही समाजाचा पाया आहे. जर परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता व विश्वासार्हता नष्ट झाली, तर संपूर्ण समाज व्यवस्थेवर त्याचे दूरगामी दुष्परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही.
सध्या देशभरात तसेच महाराष्ट्रात परीक्षा पेपरफुटी प्रकरण अत्यंत चर्चेचा विषय बनलेला असून त्याबाबत केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) मार्फत तपास सुरू आहे व काही आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे. मात्र परीक्षा गैरप्रकार, पेपरफुटी, कॉपी, बनावट उपस्थिती व निकालांमध्ये संशयास्पद हस्तक्षेप यांसारखे प्रकार केवळ परीक्षेपुरते मर्यादित नसून महाराष्ट्रातील इतर अनेक स्पर्धा परीक्षा तसेच इयत्ता 10 वी व 12 वीच्या परीक्षांपर्यंत हे जाळे पोहोचल्याची गंभीर शंका निर्माण होत आहे.
राज्यात अनेक खाजगी अकॅडमी व कोचिंग क्लासेस मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. काही ठिकाणी विद्यार्थी दिवसभर कोचिंग क्लासमध्ये शिकत असतानाही त्यांची उपस्थिती ग्रामीण भागातील किंवा नव्याने सुरू करण्यात आलेल्या शाळा/महाविद्यालयांमध्ये दर्शविली जाते. प्रत्यक्षात विद्यार्थी त्या शाळांमध्ये उपस्थित राहत नाहीत. हा प्रकार शिक्षण व्यवस्थेच्या मूलभूत तत्त्वांनाच बाधा आणणारा आहे. तसेच काही कोचिंग क्लासेसकडून “निकालाची हमी” दिली जाते.
परंतु हे क्लासेस विद्यार्थ्यांना फक्त, किंवा इतर प्रवेश परीक्षांसाठी आवश्यक विषयांपुरतेच शिक्षण देतात व राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जाते. परिणामी, अनेक विद्यार्थी नियमित शैक्षणिक ज्ञानापासून वंचित राहत असून बोर्डाच्या परीक्षांचे महत्त्व केवळ औपचारिकतेपुरते उरले आहे. कॉपीचे वाढते प्रकार, संशयास्पद निकाल, बनावट उपस्थिती आणि शिक्षणातील व्यापारीकरण यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण धोक्यात आले आहे.
याचा अत्यंत गंभीर सामाजिक परिणाम होत असून प्रतिष्ठित शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची संख्या घटत चालली आहे. दुसरीकडे अकॅडमी व कोचिंग क्लासेसची संख्या अनियंत्रितरीत्या वाढत आहे.
उदाहरणार्थ, बारामतीसारख्या तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अकॅडमी चालवल्या जात असून अनेक विद्यार्थी 50 ते 100 किलोमीटर दूरवरून येथे येतात. काही ठिकाणी निष्पक्ष परीक्षा झाल्यास उत्तीर्ण होणेही कठीण असणाऱ्या विद्यार्थ्यांना “निकाल निश्चित” असल्याचे आश्वासन दिले जाते. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेभोवती गंभीर गैरप्रकार सुरू असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे या विषयाकडे केवळ शैक्षणिक प्रश्न म्हणून नव्हे, तर सामाजिक व कायदेशीर दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे अशीही विनंती केली आहे.
https://youtu.be/wZocchevvTo?si=6pgkuERn_T4UH1ED






