विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल
प्रतिज्ञा मजूर सहकारी संस्थेचे मतदार म्हणून दरेकर यांनी मजूर या प्रवर्गातून मुंबै बँकेची निवडणूक लढविली. प्रतिज्ञा मजूर संस्थेत ते रंगारी असल्याचे दाखविले होते.
विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल
प्रतिज्ञा मजूर सहकारी संस्थेचे मतदार म्हणून दरेकर यांनी मजूर या प्रवर्गातून मुंबै बँकेची निवडणूक लढविली. प्रतिज्ञा मजूर संस्थेत ते रंगारी असल्याचे दाखविले होते.
मुंबई :प्रतिनिधी
भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणी दरेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘मजूर’ असल्याचे भासवून वर्षानुवर्ष मुंबई बँक, हजारो ठेवीदार आणि सहकार विभागाची फसवणूक करणाऱ्या प्रवीण दरेकर यांच्या विरोधात आम आदमी पक्षाने दोन महिन्यांपूर्वी तक्रार दाखल केली होती. मात्र माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप आहे.
आम आदमी पक्षाचे नेते धनंजय शिंदे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मुंबै बँकेची निवडणूक झाली त्यावेळी मजूर म्हणून प्रवीण दरेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला होता. या निवडणुकीत ते निवडूनही आले होते. या प्रकारामुळे प्रवीण दरेकर यांनी बँकेच्या हजारो ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला होता. याच प्रकरणात प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
सहकार विभागाचे सह निबंधक बाजीराव शिंदे यांनी मजूर म्हणून प्रवीण दरेकर याना अपात्र घोषित केले. त्यानंतर त्यांचा जबाब ही पोलिसांनी नोंदवला तसेच सर्व कागदपत्रे सहकार विभागाने देऊनही पोलीस गुन्हा दाखल करत नव्हते. याबाबत आम आदमी पक्षाच्या वतीने आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे गुन्हा दाखल व्हावा म्हणून सातत्याने पाठपुरावा केला. शेवटी आम्ही जनआंदोलन करण्याची तयारी सुरु केली तेव्हा आज दोन महिन्यांनी मुंबै बँकेच्या बोगस व बनावट मजुरावर गुन्हा दाखल झाला असं आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी म्हटलं आहे.
सहकार विभागाने बजावली होती नोटीस
प्रविण दरेकर यांनी मुंबै बँक निवडणुकीसाठी मजूर संस्थे अंतर्गत अर्ज दाखल केला होता. यापूर्वीही दरेकर मजुर संस्थेचे प्रतिनिधी म्हणूनच मुंबै बँकेवर अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. आताही त्यांनी प्रतिज्ञा मंजूर संस्थेमार्फत मुंबै बँक निवडणुकीसाठी अर्ज भरला. मात्र दरेकर मजुर नसल्याचा आक्षेप घेत त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने दरेकर यांना सहकार विभागाने नोटीस बजावली होती. या नोटिशीत आपण मजूर आहात की नाही? अशी विचारणा दरेकर यांना करण्यात आली होती. तसेच दरेकर यांनी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या कुटुंबाची स्थावर मालमत्ता 2 कोटी 9 लाख रुपये असल्याचे दाखवले होते. दुसरीकडे विरोधी पक्षनेते म्हणून दरेकर यांना 2 लाख 50 हजार मानधन मिळत आहे. त्यामुळे आपण प्रथमदर्शनी मजूर असल्याचे दिसून येत नसल्याचेही नोटिशीत नमुद करण्यात आले होते.
प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया
या प्रकरणी प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, सुडबुद्धीने कारवाई करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांवर दबाव आणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरीश महाजन यांच्या विरोधात जसं षडयंत्र रचण्यात येत होतं तशाच प्रकारे माझ्या विरोधात गुन्हा दाखल करुन अडकवून दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कसा आणि कशाच्या आधारे गुन्हा दाखल केला हे माहिती नाही. पण कायदेशीर प्रक्रियेने न्यायालयात याला उत्तर देऊ.