वै.शेरकर बाबा समाधीस्थळ पालखी महामार्गावरील भूसंपादनातून वाचवा;राष्ट्रीय समाज पक्षाकडून आंदोलनाचा इशारा
तहसीलदारांकडे दिले मागणीचे निवेदन

वै.शेरकर बाबा समाधीस्थळ पालखी महामार्गावरील भूसंपादनातून वाचवा;राष्ट्रीय समाज पक्षाकडून आंदोलनाचा इशारा
तहसीलदारांकडे दिले मागणीचे निवेदन
इंदापूर : प्रतिनिधी
संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील मौजे सुरवड/ वकील वस्ती ( ता.इंदापूर ) येथील वै.शेरकर बाबा समाधीस्थळ महामार्गावरील भूसंपादनातून वाचवण्याबाबत राष्ट्रीय समाज पक्षाने गुरुवारी ( दि.५ ) इंदापूरचे तहसीलदार अनिल ठोंबरे यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
वै.शेरकर बाबा समाधी मंदीर हलवण्याबाबतची नोटीस प्राप्त झाल्यानंतर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पालखी महामार्ग समाधी मंदिर न हलवता पूर्व बाजूने रस्ता नेण्यात यावा अशी विनंती प्रांत अधिकारी, उपविभागीय अधिकारी बारामती यांना व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दि.२१ जानेवारी २०२१ रोजी पुणे येथे झालेल्या भूसंपादन संदर्भातील मीटिंग मध्ये केली होती.त्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे बदल होणे अपेक्षित होते.परंतु अद्यापही कामास योग्य ती गती मिळालेली नाही.त्यामुळे सदरील विषयास अनुसरून सर्वतोपरी प्रयत्न करून वै.शेरकर बाबा समाधी भूसंपादनात बाधित न होता समाधी मंदिराच्या पूर्व बाजूने पालखी महामार्ग काढल्यास मंदिर ही वाचेल व मार्गही सरळ होत आहे. भूसंपादन झाल्यास पंचक्रोशीतील समस्त वारकरी संप्रदाय व भाविक भक्तांच्या भावनांशी खेळल्या प्रमाणे होईल.त्यामुळे समाधी मंदिर बाधित न होता पालखी महामार्ग प्रस्थापित करावा अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
मौजे सुरवड/ वकील वस्ती ( ता.इंदापूर ) गावच्या शिवेवर वै.शेरकर बाबा समाधीस्थळ मंदीर आहे.संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळा सदर ठिकाणी आरतीसाठी थांबतो,सोहळ्यातील सर्व दिंड्या समाधी दर्शन घेऊन पुढे पंढरपूरकडे मार्गस्थ होतात.त्यामुळे सदरील समाधी मंदिर वाचणे गरजेचे आहे.समाधी स्थळाचा एक कोपरा,एक वीट आम्ही हालू देणार नाही.जर प्रशासनाने येत्या चार-पाच दिवसात हालचाल केली नाहीत तर त्या ठिकाणी रास्ता रोको करून सदरील भूसंपादन रद्द होत नाही तोपर्यंत ती जागा सोडणार नाही असा इशारा रासपचे जिल्हाध्यक्ष किरण गोफणे यांनी दिला आहे.यावेळी इंदापूर शहराध्यक्ष श्रीनिवास सातपुते,गणेश होळकर,तात्याराम मारकड व इतर ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते.