इंदापूर येथील खाजगी रुग्णालयाचे बेड अधिग्रहित करण्याची शिवसेनेची मागणी
तहसीलदार सोनाली मेटकरी यांना दिले निवेदन.

इंदापूर येथील खाजगी रुग्णालयाचे बेड अधिग्रहित करण्याची शिवसेनेची मागणी.
तहसीलदार सोनाली मेटकरी यांना दिले निवेदन.
इंदापूर:-प्रतिनिधी
कोरोनाचा वाढत चाललेला प्रादुर्भाव व कोरोनाग्रस्त रुग्णांची होणारी हेळसांड टाळण्यासाठी व त्यांच्यावर त्वरित उपचार व्हावेत याकरिता आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत इंदापूर तालुक्यातील असणाऱ्या खाजगी रुग्णालयातील बेड अधिग्रहित (ताब्यात घेणे) करणे गरजेचे आहे, अशी मागणी दि.19 ऑगस्ट रोजी शिवसेनेच्या वतीने इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र काळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पासलकर, शिवसेना समन्वयक विशाल बोंद्रे, देविदास दिवेकर, तालुकाप्रमुख नितीन शिंदे,इंदापूर शहर प्रमुख महादेव सोमवंशी, दुर्वाश शेवाळे, अरुण पवार, अवधूत पाटील, मनोज विटकर,अंकुश गावडे इत्यादींच्या निवेदनावर सह्या केल्या आहेत.
इंदापूर तालुक्यात वाढत्या कोरोनाग्रस्त रुग्णांची पार्श्वभूमी पाहता लवकरच एकूण रुग्णांचा आकडा चारशेपार जाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.दिवसेंदिवस वाढणारी रुग्णांची संख्या व वाढत असलेले मृत्यूचे प्रमाण लक्षात घेता उपचारासाठी पाहिजे तेवढ्या प्रमाणात व्हेंटिलेटर व इतर सुविधांची सोय नसल्याने अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले असल्याची चर्चा शहरात आहे.
इंदापूर उपजिल्हा रुग्णालया अंतर्गत असणाऱ्या कोविड केअर सेंटर मधील व्हेंटिलेटर तसेच अपुऱ्या पडणाऱ्या सुविधांमुळे अनेक कोरोनाग्रस्त रुग्णांना गंभीर परिस्थितीमध्ये अकलूज,बारामती, पुणे अशा अन्य ठिकाणी हलवावे लागत आहे. त्यामुळे संबंधित रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ होत आहे.सर्वसामान्य गोरगरिबांना तर अशा ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्या अगोदरच पैशांची मागणी होत असल्याचे प्रकार घडत असल्याने शहरातील अनेक नागरिकांनमधून सुद्धा खाजगी रुग्णालयातील बेड अधिग्रहित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.