शरद पवार इन्सपायर फेलोशिप प्रशिक्षण समारोप समारंभ संपन्न
फेलोशिपचा 21 दिवसांचा कार्यक्रम यशस्विरित्या पार पाडण्यासाठी अनेक जाणकारांना निमंत्रित करण्यात आले होते.
शरद पवार इन्सपायर फेलोशिप प्रशिक्षण समारोप समारंभ संपन्न
फेलोशिपचा 21 दिवसांचा कार्यक्रम यशस्विरित्या पार पाडण्यासाठी अनेक जाणकारांना निमंत्रित करण्यात आले होते.
बारामती वार्तापत्र
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या कृषि, साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रातील शरद पवार इन्सपायर फेलोशिप प्रशिक्षणाचा समारोप समारंभ आज इनक्युबेशन सेंटर, ॲग्रीकल्चर कॉलेज बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या उपस्थित पार पडला.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, उद्योजक प्रतापराव पवार, विजय शिर्के, अजय शिर्के, एमकेसीएलचे डॉ. विवेक सावंत, सीओईपीचे भरतकुमार अहुजा, विठ्ठल मनियार, प्रा. निलेश नलवडे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, फेलोशिपच्या माध्यमातून तरुण संशोधक, साहित्यिक, कृषितज्ज्ञ पुढे आले पाहिजेत. समाजाला व्यापक हिताच्या दृष्टिकोनातून त्यांनी मदत केली पाहिजे. पिकांवरील विविध रोगावर नियंत्रण आणण्यासाठी नवीन संशोधकांची मदत झाली पाहिजे.
शेतीसारख्या विषयावर ॲग्रीकल्चर ट्रस्ट बारामती चांगले काम करत आहे. या ठिकाणी फेलोशिपचे प्रशिक्षण घेतलेल्या युवकांनी शेतीसारख्या विषयावर संशोधन करून शेतीला अधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी. असल्या चांगल्या कामांना शासनाचे सहकार्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. फेलोशिप प्रशिक्षणात सहभागी झालेल्या सर्व युवकांचे त्यांनी अभिनंदन केले.
ज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांसाठी करा-शरद पवार खासदार पवार म्हणाले, जिद्द, अभ्यासू प्रवृती, अफाट कष्ट करण्याची तयारी असल्यावर यश हमखास मिळतेच हे फेलोशिपच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे. त्यांनी इतर विद्यार्थ्यांना प्रेरित करावे. फेलोशिपच्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा उपयोग शेतकरी बंधूंना व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, फेलोशिपचा 21 दिवसांचा कार्यक्रम यशस्विरित्या पार पाडण्यासाठी अनेक जाणकारांना निमंत्रित करण्यात आले होते. फेलोशिपच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असेल आणि पुढे काय करायचे हे त्यांना चांगले कळाले असेल. आता सर्वांनी पूर्ण क्षमतेने यापुढे यश संपादन करावे. ज्या आव्हानाला देशाला सोमोरे जावे लागते आहे त्यावर मात करण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा असे आवाहन करून त्यांनी प्रशिक्षणार्थींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या , फेलोशिप प्रशिक्षणात 40 मुलांचा सहभाग होता. सर्वच मुलांची सृजनशीलता वाखाणण्याजोगी होती. ही सर्व मुले ग्रामीण भागातील होती. आधीच्या तुकडीतील मुलांनी येणाऱ्या मुलांचे मार्गदर्शक व्हावे आणि या माध्यमातून मुलांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी प्रास्ताविकात संस्थेची माहिती दिली तसेच उद्योजक प्रतापराव पवार डॉ. विवेक सांवत यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले.
शरद पवार इन्सपायर फेलाशिपसाठी 1279 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती प्रा. निलेश नलवडे यांनी दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी फेलोमधून 3 सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थींना मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले.