शरद पवार भेटीनंतर चंद्रशेखर राव म्हणाले,भाजपला टक्कर देण्यासाठी आता बारामती हब बनणार!
सर्व राजकीय पक्षांची मोट बांधून बारामतीत भेटणार असल्याचे सांगितले आहे.
शरद पवार भेटीनंतर चंद्रशेखर राव म्हणाले,भाजपला टक्कर देण्यासाठी आता बारामती हब बनणार!
सर्व राजकीय पक्षांची मोट बांधून बारामतीत भेटणार असल्याचे सांगितले आहे.
मुंबई :प्रतिनिधी
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
त्यानंतर त्यांनी सिल्व्हर ओक या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.शरद पवार आणि चंद्रशेखर राव यांच्यात दीड तास चर्चा झाली. या भेटीत देशातील परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
देशात भाजपला टक्कर देण्यासाठी आता बारामती हब बनणार असे एकदरीत चित्र निर्माण झाले आहे, कारण राव यांनी लवकरच सर्व राजकीय पक्षांची मोट बांधून बारामतीत भेटणार असल्याचे सांगितले आहे. या भेटीनंतर या आघाडीचा अजेंडा देशासमोर ठेवण्यात येईल असेही राव म्हणाले. त्यामुळे भाजपविरोधात लढण्याचा प्लॅन बारामतीत तयार होणार एवढं मात्र नक्की झालंय.
देशातील परिवर्तनच्या लढ्यासाठी पवारांनी पुढाकार घ्यावा, असं वक्तव्य चंद्रशेखर राव यांनी केलं आहे.शरद पवार अनुभवी नेते आहेत, त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल, सर्वांशी चर्चा करुन एक रणनिती ठरवली जाईल. देशासमोर आज मोठी समस्या आहे, गरीबी, शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे विषय असेल यातून मार्ग काढण्यासाठी काय करता येईल यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. समविचारी पक्षाचं एकत्र संमेलन बारामतीत होऊ शकतं, असे संकेतही चंद्रशेखर राव यांनी दिले आहेत.
भेटीनंतर पवार काय म्हणाले?
तर राव यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत बोलताना पवार म्हणाले, आजची मिटिंग वेगळ्या मुद्द्यावर होती. देशातल्या बिकट परिस्थिवर चर्चा झाली. राजकीय चर्चा जास्त केली नाही, लोकांच्या अडचणींवर जास्त चर्चा होणं गरजेचं होतं.तसेच तेलंगणाने देशाला एक रस्ता दाखवला आहे. शेतकऱ्यांसाठी त्यांनी चांगलं काम केलं आहे, असे म्हणत त्यांनी तेलंगणाचे कौतुक केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून रोखणारे पवार देशात भाजपला रोखण्यात यशस्वी होणार का? हे आगामी काळच सांगेल. मात्र देशात एक नवी आघाडी भाजपविरोधात एकवटत असल्याचे तरी सध्या दिसून येत आहे. या भेटीनंतर सुडाच्या राजकारणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही भाजपवर तोफा डागल्या आहेत.