शहा गावच्या रस्त्याचे काम दर्जेदार व जलदगतीने करा : सुरज धाईंजे
रस्त्याचे कामं दर्जेदार न केल्यास आंदोलन छेडण्याचा दिला इशारा

शहा गावच्या रस्त्याचे काम दर्जेदार व जलदगतीने करा : सुरज धाईंजे
रस्त्याचे कामं दर्जेदार न केल्यास आंदोलन छेडण्याचा दिला इशारा
इंदापूर : प्रतिनिधी
शहापाटी ते शहागावठाण दरम्यान सध्या चालू असलेले मेन रोडच्या डांबरीकरणाचे काम अत्यंत संथ गतीने चालू आहे. त्यामुळे हे काम जलदगतीने व दर्जेदार करण्याची मागणी बहुजन मुक्ती पार्टी इंदापूर तालुका संघटक सुरज धाईंजे यांनी केली आहे.
गेल्या एक महिन्यांपासून रस्ता बनविण्याकरिता उकरण्यात आला आहे. बऱ्याच दिवसांनी सुरू केलेल्या या रस्त्याचे काम अक्षरशः कासव गतीने चालू आहे. रस्त्यावर टाकलेली खडी व्यवस्थित चोपली गेली नाही, त्यामुळे येथून ये जा करताना ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागत आहे. शहा, महादेवनगर सह सरडेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील काही वस्त्यांवरील ग्रामस्थांना पर्यायी मार्ग नसल्याने त्यांचे प्रचंड हाल होत आहेत.तसेच कामाच्या दर्जा बाबतीतही शंका येत असल्याचे मत धाईंजे यांनी व्यक्त केले आहे.
सदरचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे तसेच विनंतीवजा निवेदन देऊन ही काम दर्जेदार व जलदगतीने करण्यात आले नाही तर संबंधितांच्या विरोधात वरिष्ठांशी पत्रव्यवहार करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.