शहीद जवान रामेश्वर काकडे यांच्या कुटुंबियाला सर्वतोपरी मदत करणार – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
पालकमंत्री भरणे यांनी काकडे कुटुंबियांचे केले सांत्वन
शहीद जवान रामेश्वर काकडे यांच्या कुटुंबियाला सर्वतोपरी मदत करणार – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
पालकमंत्री भरणे यांनी काकडे कुटुंबियांचे केले सांत्वन
इंदापूर : प्रतिनिधी
मौजे गौडगाव (ता. बार्शी) येथील रामेश्वर काकडे हे जवान छत्तीसगड येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यामध्ये बुधवारी शहीद झाले. शुक्रवारी (दि.१८) पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गौडगाव येथे शहीद जवानाच्या घरी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच राज्य शासनाकडून कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही भरणे यांनी दिली.
शहीद काकडे यांना वीर मरण आले आहे, रामेश्वर यांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांचे कुटुंबीय गरीब आहेत. आई-वडील, पत्नी यांच्यासह तीन महिन्याचा मुलगा आहे. यामुळे शासन स्तरावरून मदत मिळवून देण्यासाठी सर्व यंत्रणा काम करतील, असेही यावेळी भरणे यांनी सांगितले.
याप्रसंगी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शहीद काकडे यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, सरपंच स्वाती पैकेकर, तहसीलदार सुनील शेरखाने, वडील वैजिनाथ काकडे, आई सुनंदा काकडे, पत्नी रोहिणी यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.
शहीद जवान रामेश्वर काकडे हे २०१२ साली जम्मू काश्मीरमध्ये सैन्यदलात रुजू झाले होते. त्यानंतर त्यांनी विविध राज्यातील सीमेवर सेवा बजावली होती. सध्या ते छत्तीसगड राज्यातील रायपूर भागात कार्यरत होते, बुधवारी पहाटे झालेल्या चकमकीत त्यांना वीरमरण आले