शासनाच्या पूर्ण लॉकडाउनला इंदापूर मधील व्यापाऱ्यांचा विरोध
शासनाच्या नियमांनुसार दुकाने चालू ठेवण्यास मागितली परवानगी

शासनाच्या पूर्ण लॉकडाउनला इंदापूर मधील व्यापाऱ्यांचा विरोध
शासनाच्या नियमांनुसार दुकाने चालू ठेवण्यास मागितली परवानगी
इंदापूर : प्रतिनिधी
शासनाने दि.३० एप्रिल पर्यत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यावसायिकांसाठी लॉकडाऊन घोषित केल्याने या निर्णयाचा इंदापूरातील व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केला असून शासनाने घेतलेला संपूर्ण लॉकडाऊन चा निर्णय मागे घेण्याबाबतच्या मागणीचे निवेदन इंदापूर शहर व्यापारी संघाकडून आज दि.७ रोजी प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे देण्यात आले आहे.
मागील एक वर्षांपासून कोरोना महामारीच्या संकटांशी तोंड देत असून वर्षभर कोरोना महामारीमुळे सर्वांचे अतोनात नुकसान झाले आहे. परंतु या वैश्विक संकटाला सामोरे जाताना व्यापारी वर्गाने देखील धैर्याने तोंड दिले. यामुळे झालेल्या नुकसानीची झळ आजही व्यापारी सोसत आहेत. शासनाने घेतलेल्या निर्णयाला वेळोवेळी सहकार्य करून सर्वसामान्य नागरीक, ग्राहक,प्रशासन आणि महाराष्ट्र शासन यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून महामारीच्या संकटाला सामोरे गेलो आहोत तसेच आजपर्यंत जी शासनाची देयके आहेत ती वेळच्यावेळी भरून शासनाची मदत केलेली आहे.
अचानक लॉकडाऊनचा निर्णय झाल्यामुळे व्यापाऱ्यांवर अवलंबून असणाऱ्या कामगार वर्गाचे प्रपंच चालवणे अवघड होऊन बसले आहे. निर्णय काय झाला आहे?तो किती काळासाठी आहे? याबाबत अद्याप संभ्रमावस्था असल्याचे वास्तव आहे. अशीच परिस्थिती राहिली तर होणाऱ्या नुकसानीस कोण जबाबदार असणार आहे? असे एक ना अनेक प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केले असून सदरील लॉकडाउन त्वरित उठवावा. शासनाने दिलेल्या ३० तारखेपर्यंतच्या बंद मध्ये व्यापारी वर्ग शनिवार-रविवार पूर्ण बंद ठेवून शासनास सहकार्य करेल इतर दिवशी ठरावीक वेळेत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी अशा विविध मागण्यांसह समस्या व्यापाऱ्यांनी मांडल्या असून याची दखल शासनाने घ्यावी अन्यथा रस्त्यावर उतरून याचा विरोध करण्यास भाग पाडू नये असाही इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.