‘शिवसंस्कार सृष्टी’ या नियोजित प्रकल्पासंदर्भात पर्यटन राज्यमंत्री तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
या प्रकल्पाबाबत विस्तृत माहिती सादरीकरणाचा माध्यमातून देण्यात आली
‘शिवसंस्कार सृष्टी’ या नियोजित प्रकल्पासंदर्भात पर्यटन राज्यमंत्री तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
या प्रकल्पाबाबत विस्तृत माहिती सादरीकरणाचा माध्यमातून देण्यात आली
मुंबई : बारामती वार्तापत्र
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनप्रवासाचे दर्शन, महाराजांची शिकवण, आचार-विचार, व्यवस्थापन, बुद्धी-कौशल्य यांचा अनुभव आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देणारा ‘शिवसंस्कार सृष्टी’ हा प्रकल्प पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात स्थापित करण्यासंदर्भात पर्यटन राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस खासदार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते.
या प्रकल्पाबाबत विस्तृत माहिती सादरीकरणाचा माध्यमातून देण्यात आली. एलईडी स्क्रिन, प्रोजेक्शन मॅपिंग, लेझर लाईट यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महाराजांचे जीवन व त्यातून संस्कारांचे दर्शन घडविणारी विविध दालने उपलब्ध असतील. शिवकालीन खेळ, बारा बलुतेदार, घोडस्वारी, योगविद्या, लोककला,आयुर्वेद, तत्कालीन शेती व बियाणे बँक, तत्कालीन आहार पद्धतीचा अनुभव पर्यटकांना देणारा हा प्रकल्प असेल. यातून पर्यटक उत्तम अनुभवासोबतच दांडपट्टा, कुस्ती, तलवारबाजी, घोडसवारी सारख्या साहसांचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतील, असे सादरीकरणातून खासदार डॉ.कोल्हे यांनी सांगितले.
पर्यटन राज्यमंत्री कु.तटकरे म्हणाल्या, महाराजांच्या जीवनप्रवासाचे वर्णन करणारा ‘शिवसंस्कार सृष्टी’ प्रकल्प पर्यटकांना विशेषतः तरुण पिढीला मार्गदर्शक ठरेलच. तसेच आजच्या औद्योगिक व आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज ‘द मॅनेजमेंट गुरू’ म्हणून श्रेष्ठ होते हेही अधोरेखित होईल. महाराजांनी स्वराज्यात स्त्रीयांना आदर व मान-सन्मान दिला. स्त्रीयांना स्वसंरक्षणाचे कसबही शिकता व अनुभवता येईल अशा दालनाचा येथे समावेश असावा. कल्पक योजना सुचवून या नियोजित प्रकल्पासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश राज्यमंत्री कु.तटकरे यांनी दिले.
पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक स्थाने, देहू-आळंदी यांसारखी तीर्थक्षेत्र व शिवनेरी, सिंहगड, लोहगड आदीसारखी महाराजांचा जीवनातील शौर्याचे प्रतिक असलेले गडकिल्ले म्हणजेच ‘भक्ती व शक्ती’ चे दर्शन घडविणाऱ्या पुणे जिल्ह्यात होणाऱ्या या प्रकल्पासाठी सुमारे दहा एकर जागेची आवश्यकता आहे. त्यासाठी अंदाजे 101 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. प्रकल्प पूर्णत्वास दीड ते दोन वर्षे इतका कालावधी अपेक्षित आहे, अशी माहिती देण्यात आली.
बैठकीस आमदार अतुल बेनके, आमदार अमोल मिटकरी, पर्यटन संचालक जयंत सावळकर, एमटीडीसीचे कार्यकारी अभियंता विनय वावधानी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.