शिवसेनेचा गल्लीत गोंधळ अन् दिल्लीत सावळागोंधळ; भाजपनं दाखलेच दिले
शिवसेनेचा गल्लीत गोंधळ अन् दिल्लीत सावळागोंधळ; भाजपनं दाखलेच दिले
केंद्र सरकारनं आणलेल्या नव्या कृषी विधेयकांवरून लोकसभा व राज्यसभेत वेगवेगळी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेवर भाजपनं जोरदार टीका केली आहे. ‘गल्लीत नुसताच गोंधळ आणि दिल्लीत सावळागोंधळ अशी शिवसेनेची अवस्था झाली आहे,’ असा टोला भाजपनं हाणला आहे.
कृषी क्षेत्रात अनेक सुधारणा घडवण्याचा दावा करत केंद्र सरकारनं आणलेली तीन कृषी विधेयके संसदेच्या दोन्ही सभागृहात नुकतीच मंजूर करण्यात आली. या विधेयकांना विरोधी पक्षांकडून जोरदार विरोध झाला होता. भाजपचा मित्र पक्ष असलेल्या अकाली दलाच्या हरसिमरत कौर यांनी थेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळं हा विरोधकांनाही बळ आले होते. भाजपपासून दुरावलेली शिवसेना यावर काय भूमिका घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. शिवसेनेनं लोकसभेत कृषी विधेयकाला पाठिंबा दिला. मात्र, राज्यसभेत शिवसेनेच्या सदस्यांनी विरोधात भाषण करून सभात्याग केला. शिवसेनेच्या या परस्परविरोधी भूमिकेवर भाजपनं टीका केली आहे.
भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी ट्वीट केलं आहे. ‘नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) वेळी देखील शिवसेनेनं अशीच भूमिका घेतली होती. लोकसभेत सीएएचे समर्थन केले होते आणि यू-टर्न घेऊन राज्यसभेत विरोध केला होता. कृषी विधेयकाच्या बाबतीतही हेच झाले आहे. महापालिकेच्या स्थायी समितीपासून संसद भवनापर्यंत ‘सेम टू शेम’ सुरू आहे,’ असा खोचक टोला शेलार यांनी हाणला आहे. ‘शेम’ हा शब्द वापरत त्यांनी शिवसेनेचा निषेधही केला आहे.