शेतीसाठी नीरा डावा कालव्याचे आवर्तन तातडीने सोडावे – हर्षवर्धन पाटील
शेटफळ तलाव पूर्ण क्षमतेने भरण्याची केली मागणी

शेतीसाठी नीरा डावा कालव्याचे आवर्तन तातडीने सोडावे – हर्षवर्धन पाटील
शेटफळ तलाव पूर्ण क्षमतेने भरण्याची केली मागणी
इंदापूर: प्रतिनिधी
सध्या इंदापूर तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतातील उभ्या पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतीसाठी नीरा डावा कालव्याचे आवर्तन तातडीने सोडण्यात यावे. त्याचप्रमाणे शेटफळ तलाव १०० टक्के क्षमतेने भरून घेण्यासाठी नीरा डावा कालव्यामधून तलावात पाणी सोडण्यास सुरुवात करावी, अशी मागणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुणे पाटबंधारे मंडळाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर यांच्याकडे शनिवारी (दि.३१) केली. यासंदर्भात त्यांनी धोडपकर यांचेशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली.
नीरा डावा कालव्याच्या इंदापूर तालुक्यातील फाटा क्र. ३६ ते ५९ वरील शेती पिकांना पावसाने ओढ दिल्याने सध्या पाण्याची गरज भासत आहे. त्यामुळे शनिवारी शेतकऱ्यांनी हर्षवर्धन पाटील यांना भेटून शेतातील उभ्या पिकांसाठी खरीप आवर्तन सोडणे गरजेचे असल्याची मागणी केली. सध्या वीर, भाटघर, नीरा देवधर ही धरणे पूर्ण क्षमतेने भरत आली आहेत. परिणामी, नीरा डावा कालव्याचे आवर्तन सोडण्यात काही अडचण नाही. त्यामुळे जलसंपदाने तातडीने ५९ फाट्यापासून चालू करावे, असे हर्षवर्धन पाटील नमूद केले.
शेटफळ हवेली तलावामध्ये आज रोजी फक्त १४ टक्के एवढाच पाणीसाठा आहे. त्यामुळे शेटफळ तलाव पूर्ण क्षमतेने भरून घेण्यासाठी तलावात नीरा डावा कालव्यातुन तातडीने पाणी सोडण्यात सुरुवात होणे गरजेचे आहे ,अशी मागणीही हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर यांच्याकडे यावेळी केली. दरम्यान, इंदापूर तालुक्यातील शेतीला लवकरच आवर्तन सोडण्यात येईल तसेच शेटफळ तलाव भरून घेण्यास सुरुवात केली जाईल, असे कार्यकारी अभियंत्यांनी हर्षवर्धन पाटील यांना सांगितले.