स्थानिक

बारामतीत भरधाव टिपरने दिलेल्या धडकेत डोर्लेवाडी येथील विवाहितेचा मृत्यू

चालकावर गुन्हा दाखल

बारामतीत भरधाव टिपरने दिलेल्या धडकेत डोर्लेवाडी येथील विवाहितेचा मृत्यू

चालकावर गुन्हा दाखल

बारामती वार्तापत्र

बारामती शहरातील शिवाजी चौकातून डोर्लेवाडीकडे वळण घेत असताना भरधाव टिपरने पाठीमागून दिलेल्या धडकेत डोर्लेवाडी येथील राणी रामा शिंदे (वय 32) या विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात टिपर चालक नितीन शिवाजी राठोड (वय 25, रा. सध्या रुई, ता. बारामती, मूळ रा. धनगरवाडी, ता. तुळजापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राणी शिंदे आपल्या पतीसोबत रोजच्याप्रमाणे व्यवसायासाठी सकाळी सात वाजता डोर्लेवाडी येथून निघाल्या होत्या. कुटुंबाच्या पोटापाण्यासाठी आजूबाजूच्या गावांमध्ये फेरी करत सुया, बांगड्या, जडीबुटी यांचा विक्री व्यवसाय करत होत्या.

बुधवारी दिवसभर व्यवसाय करून दोघे पती-पत्नी दुचाकीवरून घरी परतत असताना बारामती शहरातील शिवाजी चौकात पाठीमागून आलेल्या टिपरने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. या धडकेत राणी शिंदे रस्त्यावर कोसळल्या व त्यांना गंभीर दुखापत झाली. नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात आणि त्यानंतर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

राणी शिंदे यांच्या पश्चात त्यांचे पती व दोन लहान मुले आहेत. एक मुलगा दहावीत, तर दुसरा आठवीत शिक्षण घेत आहे. अचानक घडलेल्या या अपघातामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, डोर्लेवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Back to top button