स्थानिक

श्रीमंत बाबुजी नाईक यांचा इतिहास नव्या पिढीसमोर आणण्याच्यादृष्टीने परिसर विकसित करा-उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती येथील विकासकामांची पाहणी

श्रीमंत बाबुजी नाईक यांचा इतिहास नव्या पिढीसमोर आणण्याच्यादृष्टीने परिसर विकसित करा-उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती येथील विकासकामांची पाहणी

बारामती वार्तापत्र

श्रीमंत बाबुजी नाईक वाडा परिसराचा विकास प्राचीन आणि आधुनिकतेचा संगम साधत आणि वाड्याचे मूळ रूप जतन करत करावा; या माध्यमातून त्यांचा इतिहास तसेच भीमथडी ते बारामती असा बदलता प्रवास नव्या पिढीसमोर आणण्यासाठी प्रयत्न करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

बारामती परिसरातील श्रीमंत बाबुजी नाईक वाडा सुशोभीकरण, दशक्रिया घाट परिसर, गोजुबावी श्वान प्रशिक्षक केंद्र इमारत बांधकाम आदी विविध विकास कामांच्या पाहणी प्रसंगी त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर, महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, तहसीलदार गणेश शिंदे, मुख्याधिकारी महेश रोकडे,आदी उपस्थित होते.

श्रीमंत बाबुजी नाईक वाडा येथील विकासकामे करताना परिसरात भीमथडी ते बारामती असा बदलता प्रवास दाखविणारी छायाचित्रे लावावीत. परिसरात अधिकाधिक सावली देणाऱ्या विविध प्रजातीचे वृक्षारोपण करावे. नागरिकांना बसण्यासाठी वृक्षाला गोल दगडी ओटा करा.

कऱ्हा नदीच्या संरक्षक भिंतीची कामे गतीने करा. परिसरातील चेंबरवर स्थानिक पक्षाची छायाचित्रे लावून त्याची मराठी आणि इंग्रजी भाषेत माहिती नमूद करावी. नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. परिसरात स्वच्छता राहील यादृष्टीने महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या मदतीने स्वच्छता मोहीम राबवावी. परिसर देखभाल दुरुस्तीसाठी नगर परिषदेने उत्पन्नाचे स्रोत निर्मितीबाबत विचार करावा. दशक्रिया विधी घाट परिसरात स्वच्छता ठेवावी, असेही श्री. पवार म्हणाले.

गोजुबावी श्वान प्रशिक्षक केंद्राच्या इमारतीचे बांधकाम करताना पालखी महामार्गापासून साडेपाच फूट उंची ठेवावी. विकासकामे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील तसेच अकारण प्रलंबित राहणार नाहीत, याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!