यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्या प्रकरणाचा सूत्रधार सापडला, बाळ बोठेला हैद्राबादमध्ये बेड्या
रेखा जरे हत्या प्रकरणी अहमदनगर पोलिसांनी शनिवारी पहाटे बाळ बोठेला हैद्राबादमधून ताब्यात घेतले.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्या प्रकरणाचा सूत्रधार सापडला, बाळ बोठेला हैद्राबादमध्ये बेड्या
रेखा जरे हत्या प्रकरणी अहमदनगर पोलिसांनी शनिवारी पहाटे बाळ बोठेला हैद्राबादमधून ताब्यात घेतले.
अहमदनगर :बारामती वार्तापत्र रिपोर्ट
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. अहमदनगर पोलिसांनी शनिवारी पहाटे त्याला हैद्राबादमधून ताब्यात घेतले. रेखा जरे यांच्या हत्येनंतर जवळपास साडेतीन महिन्यांपासून तो फरार होता.
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची गाडी अहमदनगर जवळील जातेगावच्या घाटात अडवून धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. 30 नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावर ही घटना घडली होती. यावेळी गाडीत बसलेल्या रुणाल याने मारेकऱ्यांना पाहिलं होतं. त्याच्याच मदतीने पोलिसांनी तातडीने 5 आरोपींना गजाआड केलं. मात्र, जेव्हा या आरोपींची चौकशी करण्यात आली, तेव्हा या हत्याकांडात शहरातील पत्रकार बाळ बोठे असल्याचं समोर आलं. बाळ बोठेने सुपारी देऊन हे हत्याकांड घडवून आणल्याचा जबाब या आरोपींनी दिला.
पाच आरोपींविरुद्ध पारनेर न्यायालयात दोषारोपपत्र सादर
या प्रकरणातील पाच आरोपींविरुद्ध पोलिसांनी पारनेर न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे. रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेल्या बाळ बोठे याच्या विरोधात पारनेर येथील न्यायालयाने स्टँडिंग वॉरंट काढले होते. त्याविरोधात बोठेने जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी ही मागणी फेटाळून लावल्यामुळे बाळ बोठेविरोधात पुढील कारवाई करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झाला होता.
बाळ बोठेचा साडेतीन महिन्यांपासून गुंगारा
अहमदनगर पोलिसांनी तातडीने तपास करत रेखा जरेंच्या मारेकऱ्यासह 5 आरोपींना अटक केली. मात्र, या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार बाळासाहेब बोठे फरार होता. रेखा जरे यांच्या हत्येला तीन महिने उलटल्यानंतरही बाळ बोठेला पकडण्यात पोलिसांना अपयश आल्याने रेखा जरे यांचे कुटुंबीय आमरण उपोषणाला बसले होते.