
सत्ता गेल्याने भाजपा पक्ष विचलित – मंत्री विजय वडेट्टीवार
भाजपावर केली सडकून टीका
इंदापूर : प्रतिनिधी
राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार व विधानपरिषदेचे माजी आमदार रामराव वडकुते हे मंगळवारी ( दि.३१ ) सुनिश्चित दौऱ्यावर होते.त्यावेळी इंदापूर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधत असताना भारतीय जनता पक्षावर सडकून टीका केली आहे.
यावेळी बोलताना मंत्री वडेट्टीवार म्हणाले की,सत्ता गेल्याने भाजपा पक्ष विचलित झाला आहे.त्यामुळे भाजप पुन्हा सत्तेत येण्यासाठी ईडी,सीबीआय व इतर संस्थाचा दुरुपयोग करून दबाव तंत्राचा वापर करत पुन्हा सत्ता कशी मिळवता येईल या उद्देशाने प्रयत्न करत आहे.
अशा प्रकारे दहशतीचे वातावरण निर्माण करून शिवसेनाला किंवा महाविकास आघाडी सरकारला बदनाम कसे करता येईल हा यामागचा दुसरा उद्देश आहे.पाच वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कित्येक मंत्र्यांवर आरोप झाले मात्र एकाही मंत्र्याची सीबीआय,ईडीची चौकशी झाली नाही.राज्यामध्ये भाजपाने सूडाच्या व बदलाच्या भावनेने राजकारण चालू केले आहे.
केंद्र सरकार हे व्यापाऱ्यांच सरकार…
केंद्रातील सरकार शेतकऱ्यांप्रती किती संवेदनशील आहे,हे सगळ्यांना माहिती आहे.गेल्या नऊ महिन्यांपासून शेतकरी हक्कांसाठी लढतोय.पण त्यांच्यावर लक्ष नाही उलट त्यांच्यावर गोळीबार व लाठीचार्ज करण्यासाठी सरसावले आहे.त्यामुळे दिल्लीतील सरकार हे व्यापाऱ्यांच सरकार असल्याची टीका मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.