सरकारची धानखरेदी केंद्रे राज्यातील शेतकऱ्यांसाठी; परराज्यातून धान विक्रीसाठी आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा! उपमुख्यमंत्री अजित पवार
धान विक्रीसाठी आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अवैध धानवाहतूक करणारी वाहने जप्त करावीत
सरकारची धानखरेदी केंद्रे राज्यातील शेतकऱ्यांसाठी; परराज्यातून धान विक्रीसाठी आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा ! उपमुख्यमंत्री अजित पवार
धान विक्रीसाठी आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अवैध धानवाहतूक करणारी वाहने जप्त करावीत
मुंबई : बारामती वार्तापत्र
राज्य सरकारने सुरु केलेली धानखरेदी केंद्रे ही आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी असून या केंद्रावर परराज्यातील धान विक्रीसाठी येऊ नये, त्यातून राज्याचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणासारख्या परराज्याच्या सीमांवरील नाक्यावर कडक तपासणी मोहिम राबवावी. परराज्यातून किंवा व्यापाऱ्यांकडून राज्यातील केंद्रावर अवैध मार्गाने धान विक्रीसाठी आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अवैध धानवाहतूक करणारी वाहने जप्त करावीत. धानाच्या नोंदी काटेकोर व्हाव्यात, परराज्यातील धान राज्यात येणार नाही यासाठी संबंधित विभागीय आयुक्त व पोलिस महानिरीक्षकांनी भरारी पथके नेमून आवश्यक कारवाई करावी व केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
राज्याच्या तिजोरीवर कोरोनामुळे ताण असतानाही राज्यातील शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आपल्या राज्यात खरीप व रब्बी हंगामासाठी धानखरेदी योजना सुरु आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना आधारभूत किंमतीसह प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. महाराष्ट्रात धानाचा दर जास्त असल्याने परराराज्यातील शेतकरी आणि व्यापारी पूर्व विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यातील केंद्रावर अवैध मार्गाने धान विक्रीसाठी आणतात. हे धान खरेदी केल्यास सरकारचे आर्थिक नुकसान वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नागपूरचे विभागीय आयुक्त, पोलिस महानिरीक्षक, संबंधित चार जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी अवैध धानखरेदीला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
मंत्रालयात आयोजित या बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री अनिल देशमुख, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, पणनचे प्रधान सचिव अनुपकुमार आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नागपूरचे विभागीय आयुक्त संजीवकुमार व संबंधित जिल्हास्तरीय अधिकारी व्हीसीद्वारे सहभागी झाले होते. यावेळी राज्यातील धान खरेदीचा आढावा घेण्यात आला तसेच धान विक्रीसाठी आणणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.