सर्वपक्षीय बैठकीनंतर राज्य सरकारची चाणाक्ष खेळी;’भोंग्याबाबत राज्य सरकार भूमिका घेऊ शकत नाही’ वाचा काय म्हणाले गृहमंत्री?
केंद्र सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी
सर्वपक्षीय बैठकीनंतर राज्य सरकारची चाणाक्ष खेळी;’भोंग्याबाबत राज्य सरकार भूमिका घेऊ शकत नाही’ वाचा काय म्हणाले गृहमंत्री?
केंद्र सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी
मुंबई,प्रतिनिधी
राज्यातील मशिदींवरील भोंग 3 मे 2022 पर्यंत काढले गेले नाहीत तर मनसे आक्रमक भूमिका घेईल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. यावेळी भोंग्याबाबत राज्य सराकार भूमिका घेऊ शकत नाही. केंद्र सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.
‘भोंग्यांबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला असल्याने तो संपूर्ण देशासाठी लागू आहे. त्यामुळे याबाबत केंद्र सरकारने काही नियम केले आणि ते सर्वच राज्यांसाठी लागू केले तर राज्या-राज्यांमध्ये वेगळी परिस्थिती निर्माण होणार नाही. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ घेऊन केंद्र सरकारशी चर्चा करावी, अशी आमची भूमिका आहे,’ असं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. ही भूमिका घेऊन गृहमंत्र्यांनी हा प्रश्न केंद्राकडे टोलवल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
‘काही राजकीय पक्षांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेत डेडलाइनची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर आम्ही आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला अनेक नेते उपस्थित होते. मात्र भाजप नेते उपस्थितीत राहू शकले नाहीत. बैठकीत विविध मुद्द्यांवर साधक-बाधक चर्चा झाली. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकारने सर्व प्रकारचे प्रयत्न करावेत, अशा मतापर्यंत आम्ही आलो आहोत,’ अशी माहिती गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिली आहे.
‘3 तारखेला ईद आहे, माझी राज्य सरकारला, गृहखात्याला विनंती आहे. आम्हाला कोणतीही दंगल, तेढ निर्माण करायचा नाही. राज्याचे स्वास्थ बिघडवायचे नाही. 3 मेपर्यंत सगळ्या मौलवींशी बोलून घ्या, त्यांना समजावून सांगा, भोंगे काढून घ्या, 3 मेनंतर आमच्याकडून कोणताही त्रास होणार नाही, असा इशाराच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिला आहे. राज यांच्या भूमिकेनंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. तर काहींनी त्यांचे समर्थनही केले आहे.
गुढीपाडव्याच्या सभेत दिला होता राज ठाकरेंनी इशारा
‘मी धर्मांध नाही..प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवावा. यापूर्वी मशिदींवरील भोंग्याबाबत मी बोललो होतो. पण अजूनही ते सुरू आहे. यापुढे सरकारने मशिदीतील हे भोंगे काढले नाही तर त्या मशिदींबाहेर दुप्पट आवाजाने स्पिकर लावू आणि त्यात हनुमानचालीसा वाजवू’, असा थेट इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत दिला होता.
राज यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याचा 3 मेपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. मात्र, या अल्टिमेटमला मानण्यास मालेगावच्या मौलानांनी नकार दिला आहे. ऑल इंडिया इमाम काउन्सलिंगने मशिदीवरील भोंगे काढण्यास स्पष्ट नकार दिला आहे. अजान नमाजसाठी भोंगे आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच आपल्या राजकीय स्वार्थासाठी राज ठाकरे हा वाद वाढवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.