
सलूनचे शटर अखेर उद्या उघडणार .
काय आहेत नियम व अटी पहा.
प्रतिनिधी : सिद्धार्थ मखरे
राज्यात अखेर रविवारपासून (२८ जून) सलून दुकाने पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. सलून सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. शासनाकडून याबाबतची मार्गदर्शक तत्वे आखून देण्यात आली असून, सलून व्यावसायिकांना त्याचे तंतोतंत पालन करावे लागणार आहे. दरम्यान सलूनमध्ये तूर्त फक्त केस कापण्यास परवानगी देण्यात आली असून, सलून कर्मचारी आणि ग्राहकांना मास्क घालणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
लॉकडाउनमुळे व्यवसाय ठप्प झाल्याने सलून चालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. यामुळे काही सलून चालकांनी आत्महत्या देखील केल्या होत्या. त्यांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून असल्याने सलून चालक कित्येक दिवसांपासून दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची विनंती करत होते. तर सलून असोसिएशनने १ जुलै पर्यंत परवानगी न दिल्यास न्यायालयात जाण्याचाही इशारा दिला होता. अखेर नियमांतर्गत सलून दुकाने सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे.
शासनाने ठरवून दिलेले नियम व अटी
१. केवळ निवडक सेवा जसे की केस कापने, केसाला रंग देणे, वॅक्सिंग, थ्रेडिंग इत्यादीला परवानगी असेल. परंतु त्वचेशी संबंधित सेवांना सध्या परवानगी नाही.
२. सदर बाबी दुकानात स्पष्टपणे दर्शवल्या जाव्यात.
३. कर्मचाऱ्यांनी हातमोजे, अँप्रॉन आणि मास्क, सॅनीटायझर इत्यादीचा समावेश असलेले संरक्षक साधने वापरणे आवश्यक आहे.
४. प्रत्येक सेवेनंतर खुर्ची स्वच्छ / निर्जंतुक करणे आवश्यक आहे. तसेच दुकानातील संपूर्ण क्षेत्र आणि जमीन/ पृष्ठभाग/ फरशी प्रत्येक २ तासांनी स्वच्छ व निर्जंतुक करण्यात यावेत.
५. टॉवेल्स, नॅपकिन्स यांचा वापर झाल्यानंतर त्याची विल्हेवाट लावता येईल अशा प्रकारच्या ( Disposable ) टॉवेल्स, नॅपकिन्सचा वापर करण्यात यावा. तसेच वापरून झाल्यावर विल्हेवाट न लावता येण्याजोग्या ( Non Disposable ) उपकरणांचे प्रत्येक सेवेनंतर स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण करावे.
६. सेवा देणारा व सेवा घेणारा सोडून इतर व्यक्तींमध्ये तीन फुटाचे अंतर ठेवणे बंधनकारक राहील.
७. मास्क, रुमाल नाका तोंडाला झाकून ठेवील अशा प्रकारचे असणे आवश्यक आहे. तसेच दुकानामध्ये सॅनिटायझर, हँडवॉश, साबण व इतर हात धुण्याचे साहित्य ठेवणे बंधनकारक राहील.
८. ग्राहकांना केवळ नियोजित वेळेतच येण्यास कळवावे, व ग्राहक विनाकारण दुकानामध्ये वाट पाहत राहणार नाही याची सलून मालकांनी दक्षता घ्यावी.
९. प्रत्येक दुकानदारांनी ग्राहकांना वरील प्रमाणे घ्यावयाच्या दक्षतेबाबतची माहिती दुकानाच्या दर्शनी भागात ठळक स्वरूपात लावण्यात यावी.
१०. वरील अटींचे उल्लंघन केल्यास दंडात्मक व कायदेशीर कार्यवाही करून दिलेली मुभा रद्द करण्यात येईल.
या सर्व नियमांचे पालन करून दुकाने सुरू करण्याचा आदेश शासनाने दिला आहे.