‘सुपर स्प्रेडर’मुळे कोरोनाचा धोका जास्त – दीपक म्हैसेकर
‘सुपर स्प्रेडर’मुळे कोरोनाचा धोका जास्त – दीपक म्हैसेकर
पॉझिटिव्ह आलेले सर्व रुग्ण केवळ वैद्यकीय महाविद्यालयात न ठेवता संबंधित ठिकाणच्या कोव्हीड हेल्थ सेंटर किंवा कोव्हीड केअर सेंटरमध्ये ठेवण्याची व्यवस्था करा
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाल्यानंतर नागरिकांनी कोरोना संपल्याचा गैरसमज करून घेतला. त्यामुळे शासन आणि प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून नागरिक बिनधास्त वावरत आहेत. ही बाब सर्वांच्या अंगलट आली असून कोरोना विषाणू पुन्हा आपले हातपाय पसरवित आहे. विशेष म्हणजे ‘सुपर स्प्रेडर’मुळे कोरोनाचा धोका जास्त असल्यामुळे प्रशासनाने त्यावर लक्ष केंद्रित करून संक्रमण रोखावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांचे सल्लागार दीपक म्हैसेकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोव्हीडच्या परिस्थितीचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार आदी उपस्थित होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याला प्रशासनाने प्राधान्य दिले पाहिजे, अशा सूचना करून श्री. म्हैसेकर म्हणाले, पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध, चाचण्यांचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे. ज्या भागातून पॉझिटिव्ह रुग्ण येत आहे, तो भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करा. या भागातून कोणीही बाहेर येणार नाही, याचे योग्य नियोजन प्रशासनाने करावे. बाहेर येणारे ‘सुपर स्प्रेडर’च अधिक धोकादायक ठरू शकतात. आरोग्य पथकाद्वारे होणाऱ्या सर्व्हेक्षणाची पुन्हा पडताळणी केली पाहिजे. जेणेकरून योग्य वस्तुस्थिती समोर येईल. सर्व्हे दरम्यान संबंधितांच्या ऑक्सिजन लेव्हलची नोंद अतिशय गांभिर्यपूर्वक करा. सर्वेक्षण योग्य पध्दतीने झाले तर उपचाराची चांगली संधी असते. त्यामुळे जिल्ह्याचा मृत्युदर कमी होण्यास मदत होईल.
पॉझिटिव्ह आलेले सर्व रुग्ण केवळ वैद्यकीय महाविद्यालयात न ठेवता संबंधित ठिकाणच्या कोव्हीड हेल्थ सेंटर किंवा कोव्हीड केअर सेंटरमध्ये ठेवण्याची व्यवस्था करा. त्यासाठी शासनाच्या सुचनेनुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक करा. गृह विलगीकरणाची ज्यांच्याकडे उत्तम व्यवस्था असेल अशाच रुग्णांना गृह विलगीकरणाची सुविधा द्या. अन्यथा संबंधित रुग्णाला आरोग्य संस्थेत भरती करून घ्यावे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे मृत्यु का होत आहे, याची कारणे शोधण्यासाठी तीन सदस्यीस समितीचे गठण करा. यात मृत्यू झालेल्यांचे वय, पूर्वव्याधीग्रस्त आहे का, उपचारासाठी उशिरा दाखल झाले का, आदी बाबींचे सुक्ष्म निरीक्षण करा. मृत्यु विश्लेषण अहवाल अतिशय गरजेचा असून जिल्हा प्रशासनाने तो चांगला तयार केला आहे, अशी कौतुकाची थापही त्यांनी दिली.
एखादे संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित असेल तर प्रत्येक सदस्यांच्या संपर्कातील वेगवेगळ्या नागरिकांचा शोध घ्या. केवळ सामुहिक संपर्क शोधू नका. तसेच कोरोनातून पूर्णपणे बरा झालेला व्यक्ती पुन्हा पॉझिटिव्ह आला असेल तर त्याचे पूर्वीचे आणि आताचे नमुने राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेला पाठवा. जेणेकरून दोन्ही नमुन्यांमधील बदल निदर्शनास येईल. जिल्ह्यातील यवतमाळ, पांढरकवडा, पुसद, वणी तसेच ज्या तालुक्यात रुग्णांची संख्या वाढत आहे, अशा ठिकाणी प्रभावी नमुने तपासणी, संपर्कातील व्यक्तिंचा शोध अतिशय गांभीर्याने करा. आरोग्य यंत्रणेतील समन्वयाअभावी जिल्ह्यात समस्या उद्भवू नये, याची जाणीव ठेवा. राज्याच्या टास्क फोर्स मधील डॉक्टरांशी आरोग्य यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमित संपर्क ठेवणे गरजेचे आहे. लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी फ्रंट लाईन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करा. लसीकरणानंतरही शासनाच्या सुचनांचे प्रभावीपणे पालन करणे गरजेचे आहे. यात नियमित मास्कचा वापर, गर्दी टाळणे, सुरक्षित अंतर ठेवणे, वारंवार हात स्वच्छ धुणे आदी बाबींचा समावेश आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांना दिले. यावेळी जिल्हाधिकारी सिंह यांनी सादरीकरण केले.
बैठकीला वैद्यकीय महाविद्यालयाचे कोरोना नियंत्रक डॉ. गिरीश जतकर, मेडीसीन विभाग प्रमुख डॉ. बाबा येलके, व्हीआरडीएल लॅबचे प्रमुख डॉ. विवेक गुजर, उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडनीस, डॉ. शरद जवळे, पालिका प्रशासन अधिकारी हर्षल गायकवाड यांच्यासह संबंधित तहसीलदार, न.प.मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.
प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी : जिल्ह्याचा कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे सल्लागार दीपक म्हैसेकर यांनी यवतमाळ शहरातील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. यात शिरे ले-आऊट आणि साईनाथ ले-आऊट चा समावेश होता. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधिक्षक डॉ. भुजबळ, तहसीलदार कुणाल झाल्टे |