पुणे

सुरुवातीच्या काळात भारतात तयार होणारी लसींचा ‘तो’ साठा भारतासाठीच वापरला असता तर आज ही वेळ ओढावली नसती; उपमुख्यमंत्री ,अजितदादांचा केंद्राला टोला

12 कोटी लसींच्या खरेदीसाठी महाराष्ट्र सरकार सिरम किंवा भारत बायोटेकला एकरकमी पैसे देण्यासही तयार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले

सुरुवातीच्या काळात भारतात तयार होणारी लसींचा ‘तो’ साठा भारतासाठीच वापरला असता तर आज ही वेळ ओढावली नसती; उपमुख्यमंत्री ,अजितदादांचा केंद्राला टोला

12 कोटी लसींच्या खरेदीसाठी महाराष्ट्र सरकार सिरम किंवा भारत बायोटेकला एकरकमी पैसे देण्यासही तयार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले

पुणे:बारामती वार्तापत्र रिपोर्ट

सुरुवातीच्या काळात भारतात तयार होणारी कोरोनाची लस केंद्र सरकारने परदेशात न पाठवता आपल्याच नागरिकांसाठी वापरली असती तर आज कोरोना लसींची कमतरता जाणवली नसती, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी 12 कोटी लसींचे डोस मागितले आहेत. मात्र, आतापर्यंत आपल्याला फक्त 3 लाख डोस मिळाले आहेत. त्यामुळे सुरुवातीपासूनच वेगाने लसीकरण करण्याचा मनसुबा राज्य सरकारला अंमलात आणता येणार नाही, असे अजित पवार यांनी म्हटले.

ते शनिवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी लसीकरण वाढवण्यासाठी राज्य सरकार सिरम आणि परदेशी कंपन्यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले. केंद्र सरकारने परवानगी दिल्यास आम्ही फायझर, स्पुटनिक, मॉडर्ना या परदेशी कंपन्यांच्या लसीही विकत घेऊ शकतो. तसेच 12 कोटी लसींच्या खरेदीसाठी महाराष्ट्र सरकार सिरम किंवा भारत बायोटेकला एकरकमी पैसे देण्यासही तयार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

‘राज्यातील परिस्थिती सुधारत आहे, रुग्णालयात बेडस् उपलब्ध होण्याचे प्रमाण वाढलेय’

अजित पवार यांनी महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती सुधारत असल्याचे सांगितले. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या किंचित कमी झाली आहे. तर मुंबईमध्ये नव्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज मिळणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. पुण्यातही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आजच्या घडीला बेडस् उपलब्ध आहेत. ही परिस्थिती आशादायक असल्याचे अजित पवार यांनी म्हटले.

‘तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा टाळण्यासाठी युद्धपातळीवर कामाला सुरुवात’

गेल्या काही दिवसांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्यातील ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. रात्री दोन-दोन वाजेपर्यंत जागून हे अधिकारी वेगवेगळ्या भागांमध्ये ऑक्सिजन निर्मिती कशी करता येईल, याचा आढावा घेत होते. अनेक ठिकाणी आता ऑक्सिजन प्लांटस उभे राहत आहेत. जेणेकरून कोरोनाची तिसरी लाट आली तरी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवणार नाही, असे अजित पवार यांनी म्हटले.

तसेच ऑक्सिजन प्लांटस हे भविष्यात कोरोनाची साथ संपल्यानंतरही वाया जाऊ नयेत, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी मोठमोठ्या रुग्णालयांच्या परिसरातच ऑक्सिजन प्लांट उभारण्यावर भर दिला जात आहे, असे पवार यांनी म्हटले.

‘लसींची संख्या मर्यादित, जिल्ह्याच्या लोकसंख्येनुसार वाटप’

केंद्र सरकारने महाराष्ट्राला आता 3 लाख कोरोना लसींचा साठा दिला आहे. आता प्रत्येक आमदार आपापल्या मतदारसंघात लसीकरणासाठी आग्रही आहे. मात्र, लसींचे वाटप हे जिल्ह्यांची लोकसंख्या पाहूनच केले जाईल. लोकसंख्येच्या निकषामुळेच मुंबईच्या वाट्याला पुण्यापेक्षा अधिक कोरोना लसी आल्या, असे अजित पवार स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!