स्थानिक

: सोलारसाठी जास्तीचे पैसे मागणाऱ्या सोलार कंपनीवर होणार कारवाई!

कोणी पैशाची मागणी करत असेल तर नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा

सोलारसाठी जास्तीचे पैसे मागणाऱ्या सोलार कंपनीवर होणार कारवाई!

कोणी पैशाची मागणी करत असेल तर नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा

बारामती वार्तापत्र 

सोलार बसविण्यासाठी शेतकर्‍यांकडून खड्डे खोदून घेणे, वाहतुकीसाठी पैसे मागणे तसेच त्यांना सिमेंट, वाळू आणण्यास सांगणार्‍या मे. रोटोमॅक सोलार कंपनीने केलेल्या कामाची महावितरणकडून पाहणी केली जाणार आहे.

तोपर्यंत कंपनीचे 40 सोलारपंपांची कामे केल्याचे जवळपास 1 कोटी 16 लाखांचे देयक अदा करणार नसल्याचे महावितरण कंपनीने स्पष्ट केले आहे. तसेच, शेतकर्‍यांनी कोटेशनव्यतिरिक्त रक्कम कोणाला देऊ नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

शेतकर्‍यांना दिवसा वीज देण्यासाठी महावितरणतर्फे ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ सुरू आहे. यापूर्वी केंद्र सरकारच्या ‘कुसुम-बी’ योजनेतून सौर पंप आस्थापित केले आहेत. अनुसूचित जाती व जमातीमधील शेतकर्‍यांना 95 टक्के, तर इतर वर्गवारीतील शेतकर्‍यांना 90 टक्के अनुदानातून सौर पंप मिळतात.

त्यासाठी तीन अश्वशक्तीला (एचपी) अनुसूचित जाती व जमातीकरिता 11,486 रुपये, इतरांकरिता 22971 रुपये, पाच अश्वशक्तीसाठी अनुक्रमे 16038 रुपये व 32075 रुपये आणि 7.5 अश्वशक्तीला 11465 रुपये व 44929 रुपये भरावे लागतात. या रकमेतून सोलार पंप आस्थापित करण्यापासून त्याचे कार्यान्वयन, देखभाल व दुरुस्ती आदींचा समावेश केलेला आहे. त्यामुळे कोटेशनच्या रकमेव्यतिरिक्त कोणतेही आगाऊ शुल्क घेतले जात नाही.

शेतकर्‍यांनीही अशी आगाऊ रक्कम कोणाला देऊ नये, अथवा साहित्य आणून देऊ नये. त्यासाठी कोणी पैशाची मागणी करत असेल तर नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा.

तिथे तक्रारीची दखल न घेतल्यास बारामती मंडल कार्यालयातील नोडल अधिकारी तथा उपकार्यकारी अभियंता अरविंद भाग्यवंत यांच्या 7875768051 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून तक्रार करावी. आलेल्या सर्व तक्रारींची महावितरणकडून चौकशी केली जाईल. तसेच, सोलार कंपनीचा दोष आढळून आल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे महावितरणने कळविले आहे.

Back to top button