‘स्टार्ट अप महाराष्ट्र’साठी पवार उतरले मैदानात; कुणाला साद घातली पाहा
'स्टार्ट अप महाराष्ट्र'साठी शरद पवार सक्रिय झाले असून त्यांनी आज अनिवासीय भारतीयांना साद घातली. अनिवासी भारतीय त्यांचे उद्योग व्यवसाय राज्यात स्थापित करू शकतात व महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत सहभाग घेऊ शकतात, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
‘स्टार्ट अप महाराष्ट्र’साठी पवार उतरले मैदानात; कुणाला साद घातली पाहा
मुंबई: बारामती वार्तापत्र
महाराष्ट्र सरकारच्या नव्या औद्योगिक धोरणात अनेक सुविधा आहेत. त्यामुळे मराठी अनिवासी भारतीयांना त्यांच्या कौशल्याचा व अनुभवाचा निश्चितच फायदा होईल. अनिवासी भारतीय त्यांचे उद्योग व्यवसाय राज्यात स्थापित करू शकतात व त्याद्वारे महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत सहभाग घेऊ शकतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आखाती देशातील अनिवासीय मराठी भारतीयांना दिला.
आखाती देशातील अनिवासी मराठी भारतीयांच्या विविध संघटनांनी आज शरद पवार यांच्याशी ऑनलाइन झूम मीटिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी मराठी अनिवासी भारतीयांच्या काही समस्यांसंदर्भातही शरद पवारांनी चर्चा केली. ‘ स्टार्ट अप महाराष्ट्र ‘ या महाराष्ट्र सरकारच्या योजनेचा अनिवासी मराठी भारतीयांना लाभ मिळावा व त्यांना आर्थिक गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्यासाठी उचलल्या जाणाऱ्या पावलांसंबंधी या बैठकीत मुक्तसंवाद झाला.
नव्या संकल्पनांवर काम करणाऱ्या स्टार्ट अप उद्योजकांसाठी महाराष्ट्र सरकार आर्थिक सहाय्य देऊन प्रोत्साहन देते, असे नमूद करत नवउद्योजकांच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सिडबीच्या सहयोगाने व्हेन्चर कॅपिटल सुविधाही उपलब्ध असल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले. अनिवासी मराठी भारतीयांनी गुंतवणूक करावी म्हणून महाराष्ट्र सरकारने ईझ ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत तात्काळ एकल परवाना (महापरवाना), जागेची सहज उपलब्धता, गुंतवणूक रकमेइतका परतावा, सूक्ष्म व लघु उद्योग तसेच महिला उद्योगांसाठी वाढीव प्रोत्साहन अशा योगना आखल्यात अशी माहितीही शरद पवारांनी दिली. या सर्व सुविधा सहज मिळाव्यात म्हणून एक खिडकी संकल्पने प्रमाणेच ‘मैत्री गुंतवणूक’ कक्ष स्थापण्यात आल्याचेही त्यांना सांगितले. maitri-mh@gov.in या ई-मेलद्वारे मैत्री कक्षाशी संपर्क साधता येईल अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.
आखाती देशांमधून परत आलेल्या अनिवासी भारतीयांच्या कौशल्याचा व अनुभवाचा कशाप्रकारे उपयोग करून घेता येऊ शकेल, या प्रश्नावर चर्चा करताना शरद पवारांनी महत्त्वाच्या गोष्टी नमूद केल्या. महाराष्ट्र राज्य हे औद्यागिक विकासात नेहमीच अग्रगण्य राहिले आहे. इथे अनेक नामवंत उद्योग समूहांचे मोठे प्रकल्प आहेत. अनिवासी भारतीयांना त्यांच्या कौशल्यानुरूप अनेकविध रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. आखाती देशांमधून परत येणाऱ्या अनिवासी भारतीयांसाठी महाराष्ट्र सरकारच्या
महाजॉब्स पोर्टलवर नोंदणीसाठी काही योजना उपलब्ध आहेत. या योजनांच्या व्याप्तीबाबतही या बैठकीत चर्चा झाली. कुशल कामगारांच्या एम्प्लॉयमेंट कॉन्ट्रॅक्ट्सची पडताळणी, मराठी अनिवासी भारतीयांसाठी एनआरआय सेल याबाबतही या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.
भारतात परतत असलेल्या अनिवासी भारतीयांच्या मुलांसाठी स्थानिक शाळांमध्ये राखीव जागा तयार करता येऊ शकतील का, जेणेकरून त्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होणार नाही असे एका प्रश्नकर्त्याने सुचविले. त्यावेळी अनिवासी भारतीयांच्या मुलांसाठी शाळांमध्ये राखीव जागा ठेवता येतील. सर्वांना शाळांमध्ये प्रवेश देण्यात येईल. कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येईल, असे शरद पवार यांनी आश्वस्त केले. अनिवासीय भारतीयांच्या मुलांसाठी मराठी भाषा शिकवणी वर्ग जर आखाती देशामधील स्थानिक महाराष्ट्र मंडळातर्फे सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला गेला तर इथे शिकवलेला अभ्यासक्रम महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये ग्राह्य धरला जाऊ शकतो का? असाही प्रश्न विचारला गेला. महाराष्ट्र सरकारकडे यासंदर्भात पाठपुरावा करण्यासंबंधी त्यांना मार्गदर्शन करू असेही शरद पवार यांनी आश्वस्त केले.