
फसवणूक झाली?? ग्राहक पंचायतीचे मार्गदर्शन घ्या ‘
‘राष्ट्रीय ग्राहक दिन ‘ विशेष
बारामती वार्तापत्र
आज 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. नवीन ग्राहक संरक्षण कायदा,2019 व ग्राहक जागृती या विषयावर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे इंदापूर तालुका अध्यक्ष ,श्री किशोर भोईटे यांच्याशी केलेले हितगुज.
24 डिसेंबर 1986 रोजी जुना ग्राहक संरक्षण कायदा संसदेत पास झाला त्या दिवसापासून 24 डिसेंबर हा संपूर्ण भारत देशात ‘ राष्ट्रीय ग्राहक दिन ‘ म्हणून साजरा केला जातो.
1973 सालापासून ग्राहकावर जर काही अन्याय झाला , वस्तूच्या खरेदी-विक्रीत ग्राहकांची फसवणूक झाली तर त्यावर आवाज उठविण्यासाठी विशेष यंत्रणा नव्हती.
त्यामुळे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष ग्राहकतीर्थ स्व.बिंदुमाधव जोशी यांनी 1974 साली अखिल भारतीय ग्राहक पंचायत या देशव्यापी ,स्वयंसेवी संघटनेची स्थापना पुण्यात केली. आणि तेव्हापासून ग्राहकांना संघटित करण्याचे व ग्राहकांना शिक्षित करण्याचे काम सुरू झाले. हे काम करत असताना ग्राहक पंचायतीच्या असे लक्षात आले की ग्राहकाची फसवणूक झाल्यास एक कायदा असावा आणि त्या कायद्याच्या माध्यमातून ग्राहकाची झालेल्या फसवणुकीला न्याय मिळावा. म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या अखंड पाठपुराव्यामुळे 24 डिसेंबर 1986 रोजी संसदेत हा कायदा मंजूर करण्यात आला.
या कायद्यामध्ये ग्राहकांची फसवणूक झाल्यास त्रिस्तरीय न्यायदानाचे रचना करण्यात आली. तेव्हापासून हा कायदा ग्राहकांना न्याय देण्याचे काम करत आहे.
1986 चा ग्राहक संरक्षण कायदा हा सध्य परिस्थिती मध्ये काहीअंशी तोकडा पडत असल्याचे जाणवल्याने व आधुनिक ऑनलाइन खरेदी पद्धतीचा अवलंब केल्यामुळे 1986 च्या कायद्यात काही तरतुदी नव्हत्या म्हणून या कायद्यामध्ये सुधारणा करून 20 जुलै 2020 रोजी आताच्या काळात सुसंगत ठरतील असे ग्राहकाच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे काही बदल केले गेले.
त्यामध्ये प्रामुख्याने 2020 च्या नवीन कायद्यात असणारी त्रिस्तरीय न्यायालयाची प्रक्रिया आहे उदा. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक कोटी रुपयांपर्यंत फसवणूक झाल्यास एक ग्राहक आयोग ( न्यायालय ),
दहा कोटीरुपये पर्यंत फसवणूक झाल्यास राज्यपातळीवर एक ग्राहक आयोग ( न्यायालय )
व देशपातळीवर दहा कोटी रुपयांच्या पुढे फसवणूक झाल्यास राष्ट्रीय ग्राहक आयोग (न्यायालय )
अशी अनुक्रमे जिल्हा ग्राहक आयोग, राज्य ग्राहक आयोग व राष्ट्रीय ग्राहक आयोगामध्ये ग्राहक तक्रार दाखल करू शकतो.
ग्राहकाच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी एक केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची ही नियुक्ती करण्यात आली आहे. हे प्राधिकरण सदोष वस्तू परत मागविणे ,फसव्या जाहिराती बंद करणे ,तसेच ग्राहकावर अन्याय झाल्यास त्या उत्पादकांवर कारवाई करण्याचे अधिकार आहेत.
नवीन ग्राहक संरक्षण कायद्यात ऑनलाईन वस्तू खरेदी केल्यासही ग्राहकाला दाद मागता येते.
ग्राहक आयोगात तक्रार दाखल करण्यासाठी ग्राहकाला वकील देण्याची आवश्यकता नाही.फसवणूक झालेला ग्राहक तो ज्या जिल्ह्यातील रहिवासी आहे. तेथील आयोगामध्ये तक्रार दाखल करू शकतो. मग तो वस्तू उत्पादक कंपनी कोणत्याही जिल्ह्यातील असेल तरी सुद्धा ग्राहक ज्या ठिकाणी राहतो त्या जिल्ह्यात तक्रार दाखल करता येते. असे अनेक बदल करण्यात आलेले आहेत त्यामुळे ग्राहक ‘ राजा ‘आहे. या संकल्पनेला पाठबळ मिळते.
प्रत्येक ग्राहकांनी चौकस राहून खरेदी करावी ,खरेदी केलेल्या वस्तूची पक्की पावती घ्यावी, एक्सपायरी डेट ,बॅच नंबर, उत्पादकाचे नाव, वजन , इत्यादी सर्व गोष्टीची माहिती घ्यावी व पक्की पावती घ्यावी. म्हणजे आपली फसवणूक झाल्यास त्याविरोधात दाद मागता येईल.आपली जर फसवणूक झाली असेल व आपणास आणखी मार्गदर्शन हवे असल्यास आपण अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची मदत घेऊ शकता. ते आपणास विनामूल्य मार्गदर्शन करतील. सर्व ग्राहकांना ग्राहक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
किशोर भोईटे ,90 22 18 59 72