इंदापूर

स्वातंत्र्य सेनानी नागसेन जंगम स्वामी यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत स्वतः ला समर्पित केले- रत्नाकर मखरे

भिमाई आश्रमशाळेत शाहीर जंगम स्वामी यांची ११४ वी जयंती झाली साजरी

स्वातंत्र्य सेनानी नागसेन जंगम स्वामी यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत स्वतः ला समर्पित केले- रत्नाकर मखरे

भिमाई आश्रमशाळेत शाहीर जंगम स्वामी यांची ११४ वी जयंती झाली साजरी

इंदापूर :प्रतिनिधी

भिमाई आश्रमशाळेत नागसेन तथा शाहीर जंगम स्वामी यांची ११४ वी जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष व इंदापूर नगरीचे माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे बोलत होते.त्यावेळी मखरे म्हणाले की, शाहीर जंगम स्वामी यांचा जन्म भोंगवली (भोर) जि. पुणे. येथे छोट्याशा गावात झाला. भोर मध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून इंग्रजी हा विषय घेऊन प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. पुण्यनगरीमध्ये त्यांनी जीवाभावाची मित्र मंडळी कमवली. स्वातंत्र्यकुंड धगधगतं ठेवण्यासाठी शाहिरी, प्रवचन यासारखी दुसरी समिधा नाही. हे त्यांनी ओळखले होते. त्यांची विषय मांडण्याची पद्धत, समजावून देण्याची लकब ,भाषणातील आवाजाचा करडा स्वर, तल्लख स्मरणशक्ती आणि इंग्रजीवरचे त्यांचे प्रभुत्व हे सर्व अचाट असल्याचा अनुभव त्यांच्याशी बोलताना व सहवासात पदोपदी मला आला असल्याचे मखरे यांनी म्हटले आहे.

आपल्या शाहिरी, पोवाडे आणि प्रवचनाच्या माध्यमातून जनतेमध्ये, समाजमनात जनजागृती करून त्यांना इंग्रजांविरुद्ध लढ्यात उत्स्फूर्तपणे भाग घेण्यासाठी प्रेरित केले होते. स्वातंत्र्यपूर्वकाळात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याबरोबर स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता.पत्री सरकारच्या माध्यमातून त्यांनी खुल्या आणि भूमिगत चळवळीत सहभाग घेतला होता. तसेच जंगम स्वामी यांनी १९४२ च्या चले जाव आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला होता. त्यावेळी मराठी माणसांमध्ये स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग पेटवण्यासाठी स्वतः लिहित पोवाडा रचला आणि डफावर थाप देत गायला सुद्धा. सन १९५७ मध्ये स्वामींनी बौध्द धर्माचा स्वीकार केला. स्वामींना शेवटच्या श्वासापर्यंत स्वातंत्र्य सैनिकाचा दर्जा मात्र मिळू शकला नाही. स्वातंत्र्य चळवळीत सहभाग असल्याचे कागदोपत्री पुरावे मागणाऱ्या सरकारच्या लालफित शाहीच्या कारभाराने स्वामींच्या मृत्यूची साधी नोंद सुद्धा घेतली गेली नाही. पुढे महाराष्ट्राचे तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हांडोरे यांनी जंगम स्वामींना दलित मित्र पुरस्काराने गौरविले. शाहीर जंगम स्वामी यांचा सहवास मला लाभला असल्याचे मखरे म्हणाले. सन २००७ साली स्वामींचा १०० वा वाढदिवस भिमाई आश्रमशाळेत साजरा करण्याचे भाग्य मला लाभले. माझ्या कुटुंबाला त्यांची सेवा करण्याची संधी लाभली,जंगम स्वामींची आठवण म्हणून माझ्या संस्थेतील मुलींच्या निवासी वसतिगृहाला नागसेन तथा शाहीर जंगम स्वामी नावं दिलं असल्याचे मखरे म्हणाले.

जंगम स्वामी गप्पांच्या ओघामध्ये त्याच बुलंद आणि करड्या आवाजामध्ये हमखास पोवाडा गाऊन दाखवायचे ! ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळविण्याच्या चळवळीत अग्रणी होते. शाहिराने स्वाभिमान कधी विकता कामा नये; पण स्वाभिमान आणि अहंकार यातला फरकही त्याला कळला पाहिजे. कला ही आपली आई आहे. तिला स्वाभीमानाने जगवा. बटिक बनविण्याचा प्रयत्न करू नका. हा मूलमंत्र जंगम स्वामी यांनी दिला आहे.कार्यक्रमास संस्थेतील विद्यार्थी, मुख्याध्यापक, प्राचार्या, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!