हॉटेल व्यावसायिकाला खंडणी मागत मारहाणीचा प्रकार
बारामती एमआयडीसीतील प्रकार,, तिघांविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
हॉटेल व्यावसायिकाला खंडणी मागत मारहाणीचा प्रकार
बारामती एमआयडीसीतील प्रकार,, तिघांविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
बारामती वार्तापत्र
बारामती एमआयडीसीतील हॉटेल व्यावसायिकांकडे दरमहा पाच हजार रुपये हप्ता देण्याची मागणी करून त्यांना मारहाण करण्याचा प्रकार बारामती एमआयडीसीत घडला.मंगळवारी दुपारी 3 वा. तिघांनी हॉटेलातील खुर्ची टेबल, व साहित्याची मोडतोड केली. तसेच लगतच्या आइस्क्रीमचालकाची रोख रक्कम जबरीने चोरून नेली.
याप्रकरणी शुभम खराडे, रा. शेटफळगढे, ता. इंदापूर व त्याचे दोन अज्ञात साथीदार यांच्याविरोधात तालुका पोलिसांनी खंडणीसह जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सोमनाथ रामचंद्र महानवर यांनी फिर्याद दिली. त्यानुसार रुईतील संदीप कॉर्नर येथे महानवर हे संदीपचायनीज हे हॉटेल चालवतात. त्यांच्या हॉटेलशेजारी उगमालाल गोमाजी गाडरी यांचे संजीवनी आइस्क्रीम दुकान आहे.
मंगळवारी फिर्यादी हॉटेलात असताना त्यांच्या ओळखीचा शुभम खराडे व त्याचे दोन साथीदार हॉटेलात आले. त्यांनी चायनीजची आर्डर दिली. आरोपींनी पदार्थ खाल्ल्यानंतर फिर्यादीने त्यांच्याकडे ४६० रुपये बिलाची मागणी केली.त्यावेळी खराडे यांनी अश्लील शिवीगाळ करत मला बिल मागतो, तुला हॉटेल चालवायचे असेल तर मला दरमहा ५ हजार रुपये द्यावे लागतील, नाही तर हॉटेल बंद करावे लागेल, अशी धमकी दिली. खराडे व त्याच्या दोन्ही साथीदारांनी हॉटेलातील साहित्य फिर्यादीच्या अंगावर फेकले. त्यामुळे फिर्यादीच्या डाव्या डोळ्याला, मनगटाला दुखापत झाली. हॉटेलमधील स्टुलचीही आरोपींनी मोडतोड केली.
या सर्व प्रकारानंतर शेजारच्या आइस्क्रीम दुकानातील उगमालाल गाडरी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या पॅन्टच्या खिशातील पाकीट व दुकानाच्या गल्ल्यातील ४ हजार २०० रुपयांची रक्कम जबरीने काढून घेतली.
आजूबाजूचे सर्व दुकानदार, दुकानातील ग्राहक, लोक जमा झाल्यावर शुभम खराडे याने कंबरेला मागील बाजूस खोचलेला चाकू हातात घेऊन, कोणी पुढे आला तर एकेकाचा मुडदा पाडेन, अशी धमकी दिली. त्यामुळे सर्व दुकानदार घाबरून दुकान बंद करून पळून गेले. आरोपी तेथून दुचाकीवरून निघून गेल्यावर फिर्यादीने व लगतच्या दुकानदारांनी फिर्याद दिली.