४ लाख ४६ हजार रुपये किंमतीच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी;भिगवण पोलीस ठाण्यात अज्ञात चोराच्या विरोधात गुन्हा दाखल
म्हसोबाचीवाडी येथे घडला चोरीचा प्रकार
४ लाख ४६ हजार रुपये किंमतीच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी;भिगवण पोलीस ठाण्यात अज्ञात चोराच्या विरोधात गुन्हा दाखल
म्हसोबाचीवाडी येथे घडला चोरीचा प्रकार
बारामती वार्तापत्र
इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथे (दि.२३) रोजी भरदिवसा घरफोडी करून ४ लाख ४६ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले आहेत. भरदिवसा झालेल्या घरफोडी मुळे म्हसोबाचीवाडी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर ठिकाणी बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली.
याबाबत भूषण भाऊसो चांदगुडे (वय.२५, रा. म्हसोबाचीवाडी, ता. इंदापूर जि. पुणे) यांनी तक्रार दाखल केली असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, (दि.२३) रोजी सकाळी ११ ते दुपारी २ च्या दरम्यान फिर्यादी यांचे राहत्या घराच्या रोलिंग गेटच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला. घरातील हॉलमध्ये असलेल्या कपाटातील लॉकरधील सोन्या-चांदीचे एकूण ४ लाख ४६ हजार रुपये किमतीचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले आहेत.
यामध्ये, १ लाख ४० हजार रुपये किंमतीचा एक सोन्याचा राणीहार ६० हजार रुपये किमतीचा एक सोन्याचा नेकलेस, ८० हजार रुपये किमतीचा पदक असलेला लक्ष्मीहार, ४० हजार रुपये किमतीची एक सोन्याची चैन, ८० हजार रुपये किमतीचे एक सोन्याचा मिनी गंठण, ४० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, २ हजार रुपये किमतीचे लहान बाळाचे हातातील बिंदली व पायातील पैंजण व ४ हजार रुपये किमतीचे चांदीचे एकूण पाच गणपतीच्या मूर्ती हे ऐवज चोरट्यांनी चोरून नेले आहेत.
या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुभाष रुपनवर हे करीत आहेत