अखेर बारामतीतील वैद्यकीय महाविद्यालय संलग्न रुग्णालयाच्या नामांतरावर सरकारचा यू-टर्न
स्व. अजितदादा पवार यांचे नाव देण्याचा निर्णय मागे!

अखेर बारामतीतील वैद्यकीय महाविद्यालय संलग्न रुग्णालयाच्या नामांतरावर सरकारचा यू-टर्न
स्व. अजितदादा पवार यांचे नाव देण्याचा निर्णय मागे!
बारामती वार्तापत्र
बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संलग्न रुग्णालयाच्या नामांतरावरून निर्माण झालेला वाद अखेर निवळला असून राज्य सरकारने ‘स्व.अजितदादा पवार सर्वोपचार रुग्णालय’ असे करण्यात आलेले नामांतर मागे घेत पुन्हा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांचे नाव कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली.
वादाची पार्श्वभूमी आणि पोटनिवडणुकीचा संदर्भ
२ मार्च २०२६ रोजीच्या अधिसूचनेनुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संलग्न रुग्णालयाचे ‘स्व. अजितदादा पवार सर्वोपचार रुग्णालय’ असे नामांतर करण्यात आले होते. मात्र, या निर्णयानंतर बारामतीच्या राजकीय वातावरणात तणाव निर्माण झाला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये होणाऱ्या संभाव्य पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या नामांतरावरून आक्रमक भूमिका घेतली होती. अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाला धक्का लावल्याचा आरोप करत त्यांनी हा मुद्दा थेट ओबीसी अस्मितेशी जोडला आणि आणि बारामतीच्या पोटनिवडणुकीत उमेदवार उभा करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. लक्ष्मण हाकेंच्या या भूमिकेमुळे स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे ढवळून निघाली होती.
सरकारचा निर्णय
वाढत्या विरोधानंतर सरकारने १३ मार्च २०२६ रोजीच सुधारित निर्णय घेत संलग्न रुग्णालयालादेखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. आज विधानसभेत याची घोषणा करत मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.






