राजकीय

अखेर मुहूर्त ठरला,उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या! बारामती दौऱ्यावर नगराध्यक्ष पदासाठी कोणाचे नाव होणार जाहीर

अर्ज दाखल झाल्यानंतर अवघ्या काहीच दिवस प्रचारासाठी मिळणार

अखेर मुहूर्त ठरला,उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या! बारामती दौऱ्यावर नगराध्यक्ष पदासाठी कोणाचे नाव होणार जाहीर

अर्ज दाखल झाल्यानंतर अवघ्या काहीच दिवस प्रचारासाठी मिळणार

बारामती वार्तापत्र

बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने मोठी चढाओढ निर्माण झाली आहे. अशात आता नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांच्या नावाची चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादीकडे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची मोठी गर्दी आहे. त्यातून अंतर्गत हेवेदावे निर्माण होऊ शकतात. परिणामी उपमुख्यमंत्र्यांचे पुत्र जय पवार यांनाच मैदानात उतरवून हेवेदावे जागेवरच थांबवले जातील, अशी अटकळ सध्या बांधली जात आहे. मात्र मात्र अजित पवार याबाबत नेमकी कोणती भूमिका जाहीर करतात याकडेही लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पारंपरिक बालेकिल्ला मानली जाते. अनेक वर्षांपासून या नगरपरिषदेवर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा एकहाती दबदबा राहिला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी कोणाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जित पवारांचा बारामती दौरा – उमेदवारी ठरण्याची शक्यता

उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या (९ नोव्हेंबर) बारामतीत येणार आहेत. त्यांचा हा दौरा केवळ विकासकामांच्या आढाव्यासाठी नसून, आगामी नगरपरिषद निवडणुकांच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदासाठी कोणाला उमेदवारी दिली जाणार, याबाबतची प्राथमिक चर्चा या दौऱ्यात होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

नगराध्यक्षपद सर्वसाधारण; अनेकांची फिल्डिंग तयार

बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद यंदा सर्वसाधारण वर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे या पदासाठी अनेक दिग्गजांनी आपापली फिल्डिंग सुरू केली आहे.नगराध्यक्षपदासाठी कोण उमेदवार दिला जाणार या बाबत कमालीची उत्सुकता आहे. दरम्यान राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदासाठी जय पाटील, सुभाष सोमाणी, शाम इंगळे, अभिजित काळे, प्रदीप शिंदे, करण वाघोलीकर, जयसिंग (बबलू) काटे देशमुख, शिवाजीराव कदम, अनिल कदम, विशाल जाधव, विक्रांत तांबे, यांनी तसेच नगरसेवक पदासाठी 288 इच्छुकांनी अर्ज नेले असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली.

त्यातच अजित पवार यांचे सुपुत्र आणि युवा नेते जय पवार यांचे नावही नगराध्यक्षपदासाठी पुढे येत आहे.जय पवार यांच्या माध्यमातून बारामतीच्या स्थानिक राजकारणातून त्यांच्या सक्रिय राजकारणात प्रवेशाचा मार्ग मोकळा होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

उमेदवारी अर्ज प्रक्रिया आणि पुढील टप्पे

नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे उमेदवार निश्चित करण्यासाठी पक्षांकडे फारसा वेळ शिल्लक नाही.
अर्ज दाखल झाल्यानंतर अवघ्या काहीच दिवस प्रचारासाठी मिळणार असल्याने, राष्ट्रवादीकडून उद्या होणाऱ्या बैठकीत नगराध्यक्षपद तसेच नगरसेवक उमेदवारांची चाचपणी होण्याची दाट शक्यता आहे.

चौकट;

बहुजन समाज पक्षाचे महासचिव काळूराम चौधरी हेही नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बहुजन समाज पक्ष प्रा. लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी संघर्ष समितीसोबत युती करुन निवडणूकीला सामोरा जाणार असल्याची माहिती काळूराम चौधरी यांनी दिली.

वंचित बहुजन आघाडीकडूनही निवडणूकीसाठी बैठकांचे सत्र सुरु असून राज कुमार व मंगलदास निकाळजे यांनी देखील ही निवडणूक ताकदीने लढविण्याची घोषणा केली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवार दिला जाणार असल्याचे विजय कोलते यांनी स्पष्ट केले आहे. नगरसेवक पदासाठीही अनेकांनी मोर्चेबांधणी केलेली असून आपली वर्णी लागावी या साठी गाठीभेटी सुरु केल्या आहेत.

Back to top button