जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक लढवणार: काळूराम चौधरी यांची घोषणा
सहयोगसमोर राज्यव्यापी आंदोलन करणार;काळूराम चौधरींचा अजित पवारांना ईशारा...

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक लढवणार: काळूराम चौधरी यांची घोषणा
सहयोगसमोर राज्यव्यापी आंदोलन करणार;काळूराम चौधरींचा अजित पवारांना ईशारा…
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपरिषदेत संघमित्रा काळुराम चौधरी यांच्या निवडीनंतर राजकीय हालचालींना वेग आला असून,सामाजिक कार्यकर्ते व नेते बहुजन समाज पार्टीचे काळूराम चौधरी हे आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे. नुकतीच पणदरे (ता. बारामती) येथे त्यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना काळूराम चौधरी यांनी आगामी निवडणुकांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
सभेत त्यांनी सांगितले की, कोकरे किंवा देवकाते या कुटुंबांपैकी कोणीतरी आमदार अथवा खासदार व्हायला हवा, आणि त्या दिशेने वाटचाल करण्याची सुरुवात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीपासून करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातून सक्षम नेतृत्व पुढे यावे, यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
काळूराम चौधरी यांनी यावेळी भावनिक आठवण करून देताना सांगितले की, “मी जरी बारामतीत राहत असलो आणि तुम्ही पणदरे मध्ये राहत असलात, तरी माझ्या कन्येच्या प्रचारासाठी तुम्ही आपल्या पाहुण्या-रावयांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. तो विश्वास आणि साथ मी कधीही विसरणार नाही,” असे ते म्हणाले.
यापुढे बोलताना त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली की, येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत जातीच्या राजकारणाऐवजी नीती, प्रामाणिकपणा आणि विकासाचे राजकारण केले पाहिजे. सध्या सुरू असलेला संघर्ष हा जातीचा नसून हक्कांचा असल्याचेही त्यांनी नमूद केले.सभेत त्यांनी जमिनीच्या प्रश्नावरही ठाम भूमिका घेतली.
“ज्या जमिनी आमच्याकडून बळकावण्यात आल्या आहेत, त्या आम्हाला परत मिळाल्याच पाहिजेत. या प्रश्नासाठी मी राज्यव्यापी आंदोलन उभारणार असून,सर्व समाजघटकांना एकत्र घेऊन संयुक्त लढा उभारला जाईल,” अशी घोषणा त्यांनी केली.
या सभेला परिसरातील नागरिक, कार्यकर्ते आणि विविध समाजघटकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काळूराम चौधरी यांच्या भूमिकेमुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






