अजितदादांच्या विरोधात युगेंद्र पवार पुन्हा मैदानात.. बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीत उतरवले उमेदवार
शहरात ठराविक भागात विकास

अजितदादांच्या विरोधात युगेंद्र पवार पुन्हा मैदानात.. बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीत उतरवले उमेदवार
शहरात ठराविक भागात विकास
बारामती वार्तापत्र
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा बारामती शहरातील विरोध संपवण्याचा प्रयत्न आहे. पाठीमागच्या वेळी विरोधक असलेले आता त्यांचे उमेदवार असल्याचे दिसून येत आहे. विरोधक असणे गरजेचे आहे.
त्यामुळे लोकशाही जिवंत राहते. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून बारामती नगर परिषदेची निवडणूक ताकदीने लढविले जाईल, असे मत युगेंद्र पवार यांनी व्यक्त केले.
बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर योगेंद्र पवार यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली.पवार म्हणाले की, समविचारी पक्षांना एकत्र घेऊन आम्ही नगर परिषदेच्या निवडणुकीत पॅनल उभा करीत आहोत. त्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा सिंहाचा वाटा राहील. गेली पन्नास वर्षात बारामतीत खूप बदल झाला आहे.
बारामतीकर देखील बदललेले आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्याकडून लक्ष्मी दर्शन झाले तरी ते आम्हाला मतदान करतील. बारामती शहरात ठराविक भागात विकास झाला आहे. भिगवण रोड तेवढा चांगला दिसतो. बाकीकडे भकास पण आहे. रस्ते, वीज, गटारीचे प्रश्न अनेक भागात आहेत. बारामतीचा विकास झाला, असे सांगितले जाते.
मात्र, अपघातांची मालिका सुरूच आहे. इतर तालुक्यांपेक्षा किंवा जिल्ह्यांपेक्षा बारामतीत महागाई मोठ्या प्रमाणात आहे. पंचवीस वर्षे त्यांना सत्ता दिली ५ वर्षे आम्हाला देऊन पहा. सर्वसामान्यांना अपेक्षित असा विकास आम्ही करू, असेही युगेंद्र पवार यावेळी म्हणाले.
नगरपरिषदेत लोकशाही राहिली नाही
पवार म्हणाले की, नगरपरिषदेच्या निवडणुकीत आम्ही सामान्य घरातील चेहऱ्यांना संधी दिली आहे. मोठे लोक, पैसेवाले लोक तसेच शेठ लोक आमच्याकडे नाहीत. बारामती नगरपरिषदेत लोकशाही राहिली नाही. राष्ट्रवादी अजित पवार पक्षातून जे उमेदवार निवडून जातात त्यांना कोणत्याही अधिकार नसतात. त्यामुळे ते लोक बारामती शहरात काम करू शकत नाहीत, असा आरोप युगेंद्र पवार यांनी यावेळी केला.






