अजितदादांच्या स्मृतिस्थळी एकजुटीची शपथ! बारामती तालुका फोटोग्राफर असोसिएशनची स्थापना; विशाल साळुंखे अध्यक्षपदी
छायाचित्रकारांच्या हक्कांसाठी संघटित प्रयत्नांचा संकल्प; विशाल साळुंखे अध्यक्षपदी, तर सागर सूळ यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी

अजितदादांच्या स्मृतिस्थळी एकजुटीची शपथ! बारामती तालुका फोटोग्राफर असोसिएशनची स्थापना; विशाल साळुंखे अध्यक्षपदी
छायाचित्रकारांच्या हक्कांसाठी संघटित प्रयत्नांचा संकल्प; विशाल साळुंखे अध्यक्षपदी, तर सागर सूळ यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी
बारामती वार्तापत्र
विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर बारामती तालुक्यातील छायाचित्रकारांनी एकजुटीचे नवे पर्व सुरू केले. तालुक्यातील छायाचित्रकारांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी ‘बारामती तालुका फोटोग्राफर असोसिएशन’ची स्थापना करण्यात आली. या निमित्ताने दिवंगत अजितदादा पवार यांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक होऊन पुष्प अर्पण करण्यात आले, तसेच छायाचित्रकारांच्या व्यावसायिक हितासाठी आणि न्याय्य हक्कांसाठी एकत्रितपणे कार्य करण्याची शपथ घेण्यात आली.
शहरासह ग्रामीण भागातील ज्येष्ठ आणि युवा छायाचित्रकारांना एका छताखाली आणणे, त्यांच्या व्यावसायिक समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करणे आणि कोणत्याही छायाचित्रकारावर अन्याय होऊ नये यासाठी संघटित प्रयत्न करणे, हा या संघटनेचा प्रमुख उद्देश असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
विशाल साळुंखे अध्यक्षपदी; नूतन कार्यकारिणी जाहीर
या कार्यक्रमात संघटनेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. अध्यक्षपदी विशाल साळुंखे, उपाध्यक्षपदी प्रशांत कुचेकर व महेश रोकडे, सचिवपदी संतोष चौधरी, खजिनदारपदी बाळासाहेब कारंडे आणि कार्याध्यक्षपदी सागर सूळ यांची निवड करण्यात आली.
सल्लागार म्हणून सचिन सावंत व तृणाल गायकवाड जबाबदारी सांभाळणार आहेत. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून गौरव होले, स्वप्नील शिंदे, प्रीतम कुंभार, महेंद्र जगदाळे आणि अक्षय शेळके यांचा समावेश करण्यात आला.
छायाचित्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी एकत्रित प्रयत्न
छायाचित्रण क्षेत्रातील व्यावसायिक हित जपणे, छायाचित्रकारांच्या अडचणींवर उपाय शोधणे आणि तालुक्यातील सर्व छायाचित्रकारांमध्ये समन्वय वाढवणे यावर संघटना भर देणार आहे. अजितदादांची कार्यशैली आणि विकासाची दृष्टी प्रेरणादायी मानत सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात सकारात्मक काम करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
ज्येष्ठांसह युवा छायाचित्रकारांचा उत्स्फूर्त सहभाग
या कार्यक्रमाला ज्येष्ठ छायाचित्रकार शंकर शिंदे, योगेश दुर्गे, अतुल चव्हाण आणि अजित स्वामी यांच्यासह तालुक्यातील विविध गावांमधून आलेले छायाचित्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजयादशमीच्या शुभदिनी नव्या संघटनेची स्थापना झाल्याने छायाचित्रकारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकजूट, परस्पर सहकार्य आणि व्यावसायिक हक्कांचे संरक्षण या उद्दिष्टांसह बारामती तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या कार्याला सुरुवात झाली आहे.
छायाचित्रकारांच्या प्रश्नांना सामूहिक आवाज देत त्यांच्या हक्कांसाठी संघटितपणे काम करण्याचा संकल्प हे या नव्या संघटनेच्या स्थापनेचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.






