अजितदादांनी देवगिरी बंगला ते विमानतळ कोणत्या गाडीने प्रवास केला?देवगिरीच्या सीसीटीव्ही फूटेजची प्रतीक्षा
रस्त्यावरील किंवा इतर ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेज का चेक केले जात नाही

अजितदादांनी देवगिरी बंगला ते विमानतळ कोणत्या गाडीने प्रवास केला?देवगिरीच्या सीसीटीव्ही फूटेजची प्रतीक्षा
रस्त्यावरील किंवा इतर ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेज का चेक केले जात नाही
बारामती वार्तापत्र
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूच्या घटनेनंतर राज्यात अनेक प्रश्न उपस्थित होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.अपघात नेमका कसा झाला,तो केवळ घात होता की अपघात होता की त्यामागे काही वेगळे कारण आहे का,याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार आणि अजितदादा पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी अनेक वेळा पत्रकार परिषद घेत या संपूर्ण घटनेची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी,अशी मागणी केली आहे.या अपघातामागील सर्व परिस्थिती स्पष्ट व्हावी आणि जनतेसमोर सत्य यावे, असे त्यांनी सांगितले.
मात्र या घटनेतील काही महत्त्वाचे प्रश्न अद्यापही अनुत्तरित असल्याचे दिसून येत आहे.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शासकीय निवासस्थान देवगिरी बंगल्यावरून विमानतळाकडे जाताना नेमका कोणत्या वाहनातून प्रवास केला होता,हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित वाहन शासकीय होते की खाजगी याबाबतही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच त्या वाहनाचा चालक कोण होता आणि प्रवासाच्या वेळी त्यांच्यासोबत आणखी कोण उपस्थित होते का, याबाबतही कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध झालेली नाही.
याचबरोबर देवगिरी बंगल्यापासून विमानतळापर्यंतच्या प्रवासाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आहे का,हा देखील महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे.देवगिरी बंगल्यावरून कोणती गाडी बाहेर पडली,ती नेमक्या कोणत्या मार्गाने विमानतळावर पोहोचली आणि त्या दरम्यान काय घडले,याचा तपशील सीसीटीव्ही फुटेजमधून समोर येऊ शकतो,असे जाणकारांचे मत आहे.
सध्या चौकशीची मागणी करणारे अनेक नेते आणि कार्यकर्ते विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करण्याची मागणी करत आहेत.मात्र देवगिरी बंगला परिसरातील सीसीटीव्ही फुटेज किंवा त्या प्रवासाचा संपूर्ण तपशील तपासण्याची मागणी फारशी होत नसल्याचेही निदर्शनास येत आहे.
दरम्यान,या संपूर्ण प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी देवगिरी बंगला ते विमानतळ या प्रवासाचा संपूर्ण तपास,संबंधित वाहनाची माहिती, चालकाची चौकशी आणि उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज तपासणे आवश्यक असल्याची मागणी नागरिक आणि काही राजकीय कार्यकर्त्यांकडून होत आहे. त्यामुळे आता प्रशासन आणि तपास यंत्रणा या सर्व बाबींची दखल घेऊन सखोल चौकशी करणार का,याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
चौकट
जर एखाद्या ठिकाणी चोरी झाली तर पोलीस यंत्रणा ज्या ठिकाणी सीसीटीव्ही असेल त्या संपूर्ण रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज चेक करून त्या संबंधित चोराला शोधून काढतात.
परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा घात की अपघात याबाबत अनेक शंका उपस्थित होत असताना अजित पवारांनी देवगिरी निवासस्थान ते विमानतळ असा प्रवास करताना रस्त्यावरील किंवा इतर ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेज का चेक केले जात नाही हा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.






