अजितदादांशिवाय पहिल्यांदाच सुनेत्रा वहिनी सकाळी लवकर जि प / पं स.मतदानाला पोहोचल्या, दादांची ‘ती’ परंपरा पाळली
कोणत्याही राजकीय पक्षाने पुणे जिल्ह्यात जाहीर सभा घेतली नव्हती. केवळ वैयक्तिक भेटीगाठींवर भर देण्यात आला होता.

अजितदादांशिवाय पहिल्यांदाच सुनेत्रा वहिनी सकाळी लवकर जि प / पं स.मतदानाला पोहोचल्या, दादांची ‘ती’ परंपरा पाळली
कोणत्याही राजकीय पक्षाने पुणे जिल्ह्यात जाहीर सभा घेतली नव्हती. केवळ वैयक्तिक भेटीगाठींवर भर देण्यात आला होता.
बारामती वार्तापत्र
बारामती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज (शनिवार) मतदान पार पडत आहे. सकाळी साडेसात वाजता राज्यभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या मतदानाला सुरुवात झाली. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरी जात आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांची परंपरा पाळली. मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सकाळी लवकरच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे मतदानासाठी पोहोचले. या दोघांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदानाचा हक्क बजावला. अजित पवार हे कायमच सकाळी लवकर कामाला सुरुवात करायचे. ते मतदानालाही सकाळीच मतदान केंद्रावरच पोहोचायचे. सुनेत्रा वहिनींनी अजितदादांची हीच परंपरा कायम ठेवली.
आणखी काहीवेळाने अजित पवार यांची आई आशा पवार यादेखील मतदानासाठी येणार आहेत. तर युगेंद्र पवार, शर्मिला पवार आणि राजेंद्र पवार यांनी बारामतीच्या कन्हेरी जिल्हा परिषद शाळेत मतदान केले. आमदार रोहित पवार, पत्नी कुंती, आई सुनंदा वडील राजेंद्र पवार यांच्यासह पिंपळी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर शरद पवार यांचे मतदान माळेगाव नगरपरिषदेत व सुप्रिया सुळे यांचे मतदान बारामती नगरपालिकेत असल्याने ते आज मतदान करणार नाहीत.
यंदाची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्यादृष्टीने या निवडणुकीचा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे जिल्ह्यातील 17 पैकी 11 नगरपालिका जिंकल्या होत्या. त्यानंतर महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असल्या तरी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपची सरशी झाली होती. त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजप आणि संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तिसरी फेरी रंगली होती. यामध्ये कोण बाजी मारणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, अजित पवार निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीला येत असतानाच त्यांचे विमान कोसळले होते आणि त्यांचा मृत्यू झाला होता.
अजित पवार यांच्या निधनानंतर पुणे जिल्ह्यात प्रचार पूर्णपणे थंडावला होता. कोणत्याही राजकीय पक्षाने पुणे जिल्ह्यात जाहीर सभा घेतली नव्हती. केवळ वैयक्तिक भेटीगाठींवर भर देण्यात आला होता. त्यामुळे आता मतदार कोणाच्या पारड्यात दान टाकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला सहानुभूती मिळणार का, हे बघावे लागेल. या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे अनेक उमेदवार अजितदादांच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत होते. दोन्ही राष्ट्रवादी इतक्या एकजीव झाल्या असताना अजित पवार यांचे निधन झाले होते. त्यामुळे आता पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल काय लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






