
अजित पवारांची बारामतीत खुली ऑफर;चोर पकडा, 1 लाख रुपये मिळवा’
कॅमेरे बसवणार आहे.
बारामती वार्तापत्र
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार नेहमीच त्यांच्या परखड विधानांमुळे चर्चेत असतात. अशातच आज बारामती दौऱ्यावर असताना केलेल्या विकासकामांचे नागरिकांकडून होणाऱ्या विद्रुपीकरणावर पवार यांनी भाष्य केले.यावेळी त्यांनी तीव्र शब्दात नाराजीदेखील व्यक्त केली.
बारामती शहरातील सावतामाळी सभागृह भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमात अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केली.
मी विकास करतोय आणि काही लोक तिथं चोऱ्या करण्याचा प्रयत्न करतात. कुणाचं नुकसान झालं तर म्हणतील बघा कसा विकास चालला आहे? बोलायला कुणी हात धरू शकत नाही, असे त्यांनी म्हटले.
मी काम करताना जात बघत नाही
जो चोरी पकडून देतील, त्याला 1 लाख रुपये देऊ आणि जो चोरी करेल त्याला दोन लाख दंड करु. पकडून देणाऱ्याला 1 लाख तर 1 लाख रुपये पालिकेला देऊ, असे देखील अजित पवारांनी स्पष्ट केले. मी काम करताना जात बघत नाही. काम करण्यासाठी वाळू आणली. त्यातली वाळू काहींनी चोरून नेली. ही जित्राबं बारामतीत कशी? याचा विचार करतोय, यांचा बंदोबस्त करतो, असा इशारा देखील त्यांनी दिला.
कुणी गावले तर त्याला टायरमध्येच टाकतो
काही जण नवरात्री आली की गोधड्या धुतात, आणि वाळायला टाकतात. मी जिथं सुशोभित केलं आहे त्यावर वाळायला टाकतात. दसऱ्याच्या दिवशी बारामतीत 2300 चार चाकी गाड्या विकल्या गेल्या. साहेब आमदार होते, तेव्हा 17 हजार मतदार होते. आता मतदार 1 लाख 10 हजार आहेत. एवढी बारामतीत लोक वाढली आहेत. कुठं हार्ट काढत बसून नका. आता मी कॅमेरे बसवणार आहे. कुणी गावले तर त्याला टायरमध्येच टाकतो, असा इशारा अजित पवारांनी दिलाय.
‘जित्राबं माझ्या बारामतीत का आहेत?’
दरम्यान, अजित पवार यांनी लहान मुलांच्या खेळण्याच्या ठिकाणी त्यांना जखमा होऊ नयेत म्हणून समुद्रातील वाळू आणून टाकली असल्याचा उल्लेख केला. “वृद्ध माणसांना बसायला तिथे जागा केली. तिथे समुद्राची वाळू आणून टाकली. काही शहाण्यांनी रात्री त्यातली वाळू पिशवीत भरून चोरली, ही जित्राबं माझ्या बारामतीत का आहेत? मला प्रश्न पडलाय यांचा कायमचा बंदोबस्त झाला पाहिजे. मी काही चांगलं केलंय त्या ठिकाणी ते गोधड्या सुखवायला आणून टाकत आहेत. अरे तुझ्या घरात काय टाकायचे ते टाक ना. मी जे चांगले केले त्याचा आणून का टाकतो”, अशा शब्दांत अजित पवारांनी संताप व्यक्त केला.