स्थानिक

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत पारदर्शक चौकशी करण्याची बारामतीकरांची मागणी शासनाकडे दिले निवेदन

घटनेमुळे जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत पारदर्शक चौकशी करण्याची बारामतीकरांची मागणी शासनाकडे दिले निवेदन

घटनेमुळे जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण

बारामती वार्तापत्र 

बारामती शहरात आज मोठ्या प्रमाणावर नागरिक एकत्र येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सखोल चौकशीची मागणी केली. या अपघातामागे केवळ अपघात आहे की घातपात, याबाबत विविध स्तरांवर संशय व्यक्त केला जात असल्याने बारामतीकरांनी एकत्रितपणे भूमिका मांडली.

या पार्श्वभूमीवर बारामतीतील नागरिकांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनामध्ये घटनेची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.

यासाठी बारामतीतील प्रशासकीय भवन परिसरात मोठी गर्दी झाली होती. विविध सामाजिक संस्था, स्थानिक कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे महिलांचा सहभाग लक्षणीय होता. महिलांनीही या प्रकरणात पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी करत आपला सक्रिय सहभाग नोंदवला.

सभेदरम्यान काही नागरिकांनी भावना व्यक्त करत सांगितले की, अशा प्रकारच्या घटनेमुळे जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, शासनाने तातडीने योग्य ती पावले उचलावीत. प्रशासनाने कायदेशीर प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडून सत्य परिस्थिती स्पष्ट करावी, अशी सर्वांची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, या मागणीमुळे बारामतीत राजकीय वातावरण तापले असून पुढील काही दिवसांत शासनाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button