अजित पवार यांनी घेतला कोरोना परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा
ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव जास्त आहे

अजित पवार यांनी घेतला कोरोना परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा
ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव जास्त आहे
बारामती वार्तापत्र
बारामती शहरासह तालुक्यात कोरोना बाधीतांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजनामध्ये सातत्य राखणे आवश्यक आहे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. तसेच बारामती तालुक्यात सुरु असणारी विकास कामे दर्जेदार आणि गतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -19 विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, बारामती शहरासह तालुक्यात कोरोना बाधींतांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजनामध्ये सातत्य राखणे आवश्यक आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरुन बारामती शहरात तसेच ग्रामीण भागात सोयी सुविधा उपलब्ध करुन ठेवणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव जास्त आहे. टेस्टींग व सर्वेक्षणावर भर देणे आवश्यक आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे, एकात्मिक विकास समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता राहूल पवार, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. धोडपकर, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, रुई ग्रामिण रुग्णालयाचे डॉ. सुनिल दराडे, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, बारामती नगरपालिकेचे गटनेते सचिन सातव आदी मान्यवरांसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.