बारामतीत राजकीय समीकरणांना नवे वळण; भाजप नेते अभिजीत देवकाते यांच्या पत्नी जिल्हा परिषदेत लढणार घड्याळ चिन्हावर
राजकारण, गटबाजी आणि नव्या आघाड्यांमुळे रंगत वाढण्याची शक्यता

बारामतीत राजकीय समीकरणांना नवे वळण; भाजप नेते अभिजीत देवकाते यांच्या पत्नी जिल्हा परिषदेत लढणार घड्याळ चिन्हावर
राजकारण, गटबाजी आणि नव्या आघाड्यांमुळे रंगत वाढण्याची शक्यता
बारामती वार्तापत्र
बारामती तालुका हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेल्या अनेक दशकांपासून बारामतीतील जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांवर पवार गटाचे वर्चस्व राहिले आहे. मात्र आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडी घडताना दिसत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडणुकांमध्ये भाजपसोबत समन्वयाची भूमिका घेतल्याचे चित्र आहे. असे असतानाच भाजपचे प्रभावी नेते अभिजीत देवकाते यांच्या पत्नी शिवानी देवकाते यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या घड्याळ या चिन्हावर निरावागज गटातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भाजपशी थेट संबंध असलेल्या देवकाते कुटुंबातील उमेदवाराने घड्याळ चिन्ह स्वीकारल्याने ही केवळ औपचारिक उमेदवारी नसून, यामागे मोठी राजकीय रणनीती असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवानी देवकाते यांच्या या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
या घडामोडीमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही ही निवडणूक सोपी जाण्यासाठी ही आघाडी केली असल्याची चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये सुरू झाली आहे. बारामतीत आतापर्यंत एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीत आता अंतर्गत राजकारण, गटबाजी आणि नव्या आघाड्यांमुळे रंगत वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शिवानी देवकाते यांच्या उमेदवारीमुळे स्थानिक पातळीवर मतदारांचे लक्ष वेधले गेले असून, येत्या काळात प्रचारादरम्यान आणखी कोणते राजकीय धक्के बसतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.





