अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांना ;४० हजाराची लाच घेताना बारामतीत रंगेहाथ अटक
९० हजारांची मागणी केली होती

अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांना ;४० हजाराची लाच घेताना बारामतीत रंगेहाथ अटक
९० हजारांची मागणी केली होती
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील माळेगाव येथील अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपप्राचार्य व सध्या प्राचार्य पदाचा अतिरिक्त कारभार सांभाळणारे अवधूत भिमाजी जाधवर (वय ५३) यांना ४० हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली.
ही कारवाई मंगळवारी (दि.२४) बारामती शहरातील हॉटेल सिटी इनजवळ करण्यात आली. जाधवर यांच्या विरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
याप्रकरणी एका तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदार खाजगी पॅरामेडिकल संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांची परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शासकीय पर्यवेक्षक आवश्यक होते. त्यासाठी तक्रारदाराने संबंधित शासकीय संस्थेकडे पत्राद्वारे विनंती केली होती. जाधवर यांनी पर्यवेक्षक नेमणुकीच्या बदल्यात ४५ विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे ९० हजारांची मागणी केली होती. दरम्यान दहा हजाराची रक्कम अगोदर देण्यात आली. उर्वरित रकमेच्या मागणीसाठी जाधवर यांनी तक्रारदाराकडे तगादा लावला होता.
तक्रारदाराने या प्रकरणी एसीबीकडे धाव घेतली. एसीबीकडून तक्रारीची शहानिशा करण्यात आली. त्यानंतर सापळा रचून मंगळवारी जाधवर यांना लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक अमोल भोसले, शिपाई कोमल शेटे, कैलास महामुलकर, चंद्रकांत कदम यांनी केली.