अयोध्येतील ‘राम मंदिरासाठी ‘ बारामतीतून जाणार निधी
बाळासाहेब गावडे यांच्यावतीने एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त
अयोध्येतील ‘राम मंदिरासाठी ‘ बारामतीतून जाणार निधी
बाळासाहेब गावडे यांच्यावतीने एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त
बारामती वार्तापत्र
अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषद यांच्या माध्यमातून निधी संकलनाचे काम बारामतीत जोरदार सुरू आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी जोरदार तयारी सुरू असून 1जानेवारी ते 14 जानेवारी 2021 या कालावधीत राममंदिरासाठी निधी संकलनाचे काम सुरू झाले आहे.
या मंदिरासाठी 108 एकर जमीन उपलब्ध असून त्यामध्ये 2.7 एकरमध्ये मंदिर उभारावयाचे आहे.
मंदिर निर्माण क्षेत्र 57,400 चौरस फूट व मंदिराची एकूण लांबी 360 फूट, रुंदी 335 फूट ,एकूण कळसापर्यंत ची उंची 161 फूट तर खोली 250 फूट आहे.
या मंदिराचे तीन मजले असून मंदिरात पाच मंडप आहेत. प्रत्येक मजल्याची उंची 20 फूट आहे.या मंदिरावर ग्रंथालय ,अभिलेखागार, संग्रहालय ,अनुसंधान केंद्र ,यज्ञशाळा, वेदपाठशाळा ,धर्मशाळा ,सत्संग भवन ,प्रसाद वितरण केंद्र ,प्रशासकीय कार्यालय, सभास्थळी प्रदर्शन ,वाहनतळ, प्रसाधन अशा सर्व सुविधांनी युक्त सुसज्ज अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे या मंदिरामध्ये जगातील आणि देशातील कोणत्याही जाती-धर्माच्या लोकांना अभ्यास करण्यासाठी हिंदुस्थानातील सर्व धार्मिक ग्रंथांची व्यवस्था केली जाणार आहे. हे निधी संकलनाचे काम बारामती जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड ,पुरंदर ,भोर ,वेल्ला, येथे एक जानेवारीपासून हा निधी संकलन करण्याचे काम चालू आहे. अनेक सामाजिक धार्मिक राजकीय व उद्योजक लोकांच्या वतीने श्री राम मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळत आहे हा निधी घेत असताना समाजातील प्रत्येक घटकाचं योगदान असावे गरिबातील गरीब नागरिकांनीही त्यांचा सहभाग या कार्यात असावा म्हणून हे निधी संकलनाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
भारतीय जनता पार्टीचे नेते बाळासाहेब गावडे यांनी मंदिर निर्माणासाठी एक लाख रुपयांचा धनादेश दिला आहे.तसेच ॲड रमेश गणबोटे यांनी 21 हजाराचा धनादेश दिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बारामती जिल्हा संघचालक दिलीप शिंदे ,विश्व हिंदू परिषदेचे बारामती जिल्हा अध्यक्ष ॲड जी.बी गावडे, प्रांत कार्यकर्ते दीपक पेशवे, बारामती जिल्हा संपर्कप्रमुख मंगेश मासाळ, निधी प्रमुख किरण दंडवते यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.